नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या दुसऱया उद्रेकाच्या काळात थंडावलेल्या आर्थिक विकासाला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी आणखी एक आर्थिक पॅकेज देण्यासाठी केंद्र सरकार सज्ज झाले आहे. केंद्रीय अर्थविभाग ही योजना सज्ज करण्यासाठी काम करीत असून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
सध्या ही प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे पॅकेज प्रत्यक्ष केव्हा घोषित केले जाईल आणि ते किती आकाराचे असेल यासंबंधी आताच निश्चितपणे माहिती देता येणार नाही. तथापि, तसा विचार गंभीरपणे सुरू असून लवकरच त्याचे परिणाम दिसू लागतील. अनेक राज्यांनी लॉकडाऊन घोषित केलेला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनची देशव्यापी घोषणा केली नसली तरी राज्यांनी ती केलेली असल्याने अर्थव्यवस्था पुन्हा मंदावणार हे निश्चित आहे.
कोरोनाच्या पाठोपाठच्या दोन उदेकांमुळे मे 2020 ते मे 2021 हा कालावधी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अडचणीचा गेला. पहिला उद्रेक कमी झाल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा सुधारू लागली होती. तथापि, दुसऱया उद्रेकामुळे या सुधारणेवर पाणी फेरले गेले. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणेची अनुमाने अनेक आर्थिक सर्वेक्षण संस्थांकडून कमी करण्यात आली. अर्थव्यवस्थेचा वेग वाढविण्यासाठी आता सरकारच पुढे सरसावण्याच्या विचारात असून अर्थ विभागाचे ज्येष्ठ अधिकारी त्या दृष्टीने कामाला लागले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्योगक्षेत्र अशा पॅकेजची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे, असेही सांगण्यात आले.








