वाढीसह व्यवसाय 6.57 कोटींवरः विविध योजनांसाठी निधी
मुंबई
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2021 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात एकूण देवाणघेवाण ही 24 टक्क्यांच्या वाढीसोबत 6.5 लाख कोटांच्या घरात पोहोचत विक्रमाची नोंद केली आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये आम्ही चांगली कामगिरी केल्यामुळे वर्षाच्या दरम्यान एकूण व्यवसायाच्या उलाढालीने 6.57 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला असल्याचे नाबार्डचे अध्यक्ष जे. आर. चिंताला यांनी सांगितले आहे.
यासोबतच समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात बँकेची उधारी 2.06 लाख कोटी रुपयांनी वधारुन 3.18 लाख कोटी रुपयांवर राहिली आहे. बँकेचे कर्ज आणि अन्य खर्च 4.81 लाख कोटी रुपयांनी वाढून 6.03 लाख कोटींवर पोहचले आहे. 2019-20 च्या तुलनेत तो 25 टक्क्यांनी मजबूत झाल्याची माहिती आहे.
अत्मनिर्भर भारत मोहिम
नाबार्डने सहकारी बँकांना 16,800 कोटी रुपये, क्षेत्रीय ग्रामीण बँकांना 6,700 कोटी रुपये आणि एनबीएफसी-एमएफआयला विशेष सुविधांच्या आधारे 2,000 कोटी रुपये वितरित केले आहेत.
कृषी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी निधी
नाबार्डने कृषी आणि ग्रामीण विकासासाठी जवळपास 65,746 कोटी रुपये आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये वितरीत केले आहेत. ग्रामीण आधारभूत विकासासाठी 27,831 कोटी रुपये तर नाबार्डच्या विकास मदतीसाठी 7,506 कोटी रुपये, सिंचनसाठी 7,761 कोटी, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणसाठी 20000 कोटी रुपये, लघु सिंचनसाठी 1,827 कोटी रुपये आणि वेअरहाऊस इन्फ्रास्ट्रक्चरकरीता 825 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती आहे.









