कायदा बदलासह विविध समस्यांमुळे आयपीओ लांबणार : 10 टक्के वाटा विकणार
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून आयपीओ बाजार तेजीत असल्याचे पहावयास मिळत होते. यामध्ये काही दिग्गज कंपन्याही आहेत. परंतु सर्वात मोठय़ा आयपीओची म्हणजे एलआयसीच्या आयपीओच्या होणाऱया सादरीकरणास विलंब लागण्याचे संकेत निर्माण होत आहेत.
चालू आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ येणार नसल्याची माहिती आहे. तर पुढील आर्थिक वर्षातील तिसऱया किंवा चौथ्या तिमाहीपर्यत हा आयपीओ सादर होऊ शकतो. एलआयसी कायदा बदल आणि विविध अन्य पातळीवरील कायदेशीर बदल करण्यात येणार असल्यानेच हा आयपीओ लांबणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
एलआयसी आयपीओसाठी आतापर्यंत पहिला टप्पा सुरु करण्यात आला नाही. तसेच या संदर्भात मूल्यांकन करण्यात आलेले नाही. कारण सदरचे मूल्यांकन करण्यास जवळपास आणखी 6 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्मयता सध्या तरी सांगितली जात आहे.
सर्वात मोठा आयपीओ
एलआयसी कंपनीचा आयपीओ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ म्हणून ओळखण्यात येणार आहे. ज्याच्या आधारे सरकार 10 टक्के वाटा विकून 80 हजार कोटी रुपयांची जोडणी करण्याचे संकेत आहेत. सरकारने विविध टप्प्यावरील 25 टक्के हिस्सेदारी विकण्याचे ध्येय निश्चित केले आहे. म्हणजे यातून तब्बल 2 लाख कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. या अगोदर कोल इंडिया कंपनीने 15 हजार कोटींचा आयपीओ सादर केला आहे.









