प्रतिनिधी / सातारा
केंद्र व राज्य शासनेच्या सुचनेनुसार राज्यात सातव्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्यात आले आहे. सातव्या आर्थिक गणनेच्या राष्ट्रीय कामासाठी आपणाकडे येणाऱ्या गणनेच्या प्रगणकास खरी व वस्तुनिष्ठ माहिती देवून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले आहे.
सातव्या आर्थिक गणनेबाबत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांच्या अध्यखतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा सांख्यिकी अधिकारी तृप्ती निंबाळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व जणगणना गावे, जनगणना शहरे व नगरपालिका यांतील जनगणना 2011 च्या चार्ज रजिस्टर मधील सर्व प्रगणन गटांमध्ये समाविष्ट कुटुंबे व उद्योग यांची गणना केली जाणार आहे. या गणनेमध्ये हंगामी व बारामाही पिके, शासकीय कार्यालये, आंतरराष्ट्रीय संस्था, न्यायालये, कर कार्यालय, संरक्षण मंत्रालय, पोलिस, भ.नि.नि. कार्यालय, आंतरराष्ट्रीय संस्था-राष्ट्रसंघ, परदेशी वकीलाती, सरकारने अनाधिकृत घोषीत केलेल्या आस्थापना-जुगार, पैजा (बेटींग) इ. सोडून उर्वरित सर्व आर्थिक कार्याची माहिती गोळा केली जाणार आहे. तसेच शासकीय शाळा, संस्था, कॉलेज, रुग्णालये, वसतीगृह, सदनिका, विश्रामगृह, अतिथीगृह, राष्ट्रीयकृत बँका, सर्व सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांचा गणनेत समावेश केला जाणार आहे.
सातव्या आर्थिक गणनेचे राज्यस्तरावरील क्षेत्रकाम सी एस सी, इ- गव्हर्नन्स यांच्याकडून नेमण्यात आलेल्या प्रगणकांकडून करण्यात येणार आहे. आर्थिक गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, जिल्हास्तरावर समितीची स्थापन करण्यात आल्या आहेत. सातव्या आर्थिक गणनेच्या कामासाठी आपणाकडे येणाऱ्या गणनेच्या प्रगणकास खरी व वस्तुनिष्ठ माहिती देवून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी केले आहे.









