अध्याय अकरावा
भगवंतानी उद्धवाला भक्तीतील विरुद्धपणा उलगडून सांगितला. ते म्हणाले, भक्तीतसुद्धा विरुद्धपणा असतो. माझ्या भजनाला कमी लेखून त्यापासून जो पैसा मिळवावयाला निघतो, त्याची भक्ती भजनाच्याविरुद्ध असते. तो कोरडेपणानेच माझे भजन करतो. अशा रीतीने मला ठकवणे हे मुख्य विरुद्धलक्षण होय. ह्यालाच ‘अर्थविरुद्धता’ असे म्हणतात. आता जो भक्त दुष्ट वासनेने कर्मे करतो व मी भगवंताचे भजन करीत आहे, तेव्हा मला कोणताही दोष मुळीच लागणार नाही अशा समजुतीने जो दुष्ट वासनेतच गुंतून राहतो हे त्याचे वर्तन भजनाच्या विरुद्ध लक्षण होय. श्राद्धाचा जो संकल्प आहे तो मला अर्पण करण्यानेच विरुद्ध होत नाही असे वेदसुद्धा गर्जून सांगत आहेत. ‘पितरस्वरूपी जनार्दन’ हाच श्राद्धातील मुख्य संकल्प असतो आणि असे असता मला नैवेद्यच अर्पण करीत नाहीत.
अन्न हे ब्रह्मच आहे आणि मीही ब्रह्मच आहे हेच श्राद्धातील गुह्य वर्म आहे. पण असे शुद्ध कर्म न समजून वृथा भ्रम मात्र वाढवितात. सर्व जग उत्पन्न करणारा मी आहे, सर्व पितरांचाही मुख्य पिता मीच आहे, त्या मला कर्म अर्पण न करिता श्राद्ध करणे हे सर्वतोपरी विरुद्ध होय. मला अर्पण न करता जे जे काही करावयाचे ते ते अभक्तपणानेच होते. अशी विरुद्धधर्माची लक्षणे जो आचरतो, त्याला अनिवार व भयंकर दुःख प्राप्त होते. असो, उत्तम भक्ताची वर्तणूक पाहू. उत्तम भक्ताचे लक्षण हेच की, ते संकल्पाशिवायच अन्नपानादि मला अर्पण करतात व त्यांतील रहस्य जाणतात. जे माझ्या ठिकाणी ध्रुवाप्रमाणे अढळ भजनशीळ असतात, त्यांना माझी स्थिर व अत्यंत अढळ अशी भक्ति प्राप्त होते. आर्त, जिज्ञासु आणि अर्थार्थी या तिघांनाही जी प्राप्त होत नाही, ती माझी चौथी भक्ति त्यांना प्रेमामुळे प्राप्त होते. आर्त भक्त आपली पीडा दूर व्हावी म्हणून मला भजत असतो, जिज्ञासु भक्त आपल्याला ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून भजत असतो, तिसरा अर्थार्थी भक्त माझे भजन करून आपल्याला यथेच्छ पैसा मिळावा अशी इच्छा करतो. ह्याशिवाय ज्ञानी म्हणून चौथा असतो त्याच्या ठिकाणी अशा कल्पनांचा मागमूसच नसतो. म्हणून चौथी भक्ति असते ती त्याच्या ठिकाणीच आपले घर आहे असे समजून राहते. ज्याला भक्तीमध्ये अत्यंत आवडीने चहूंकडे जेथे तेथे मीच मी सापडत असतो, त्याला तशी स्थिती माझ्या भजनानेच प्राप्त होते. संकल्प केल्याशिवायच सर्व आपोआप मला अर्पण होणे, हे चवथ्या भक्तीचे लक्षण आहे. त्या भक्तीतील माझे भजन अतक्मर्य आहे. त्याने जे जे कर्म करावे तीच माझी पूजा, तो जे जे बोलतो तोच माझा जप, त्याने जे जे पहावे तेथे त्याला अधोक्षजाचेच पवित्र दर्शन होत असते. तेथे चालणे तीच माझी यात्रा, तो जे जे भक्षण करतो तेच यज्ञात मला अर्पिलेली आहुति होते. त्याची निद्रा तीच माझी समाधि. असा तो माझ्यामध्येच भजन करीत असतो. याप्रमाणे त्याचे सर्व कर्म सहजच मला अर्पण होते. उद्धवा ! ही सनातन चौथी भक्ति त्याला पूर्णपणे लाभते. तर माझी जी सहजप्रकाशस्थिति तिलाच ‘भागवती भक्ति’ असे म्हटलेले आहे. वेदांतामध्ये हिलाच ‘संविती’ असे म्हणतात, आणि शैवांमध्ये हिलाच ‘शक्ति’ असे म्हणतात. उपासनेच्या भेदाप्रमाणे नांवात असे पुष्कळच भेद आहेत. ते असो. अशी जी प्रकाशाची स्थिती, तिलाच भक्ति असे म्हणतात. तिच्याच प्रकाशाने त्रिभुवनात उत्पत्ति, स्थिती व लय ह्यांचा भास होतो. माझ्या अनेक प्रकारच्या ज्या अवतारमालिका आहेत, त्या ह्याच प्रकाशाने उज्ज्वल रीतीने प्रकाशत आहेत. देव, देवी वगैरे सर्व ह्याच प्रकाशाने भासमान होतात.
माझ्या अवतारांची उत्पत्ति सुद्धा त्याच प्रकाशाने होत असते आणि माझी अनेक प्रकारची चरित्रे शेवटी त्याच प्रकाशात प्रवेश करतात. अशा प्रकाशाची जी प्राप्ती, तीच माझी सनातन भक्ति होय असे समज. उद्धवा ! ती मी तुला यथार्थ रीतीने सांगितली. निश्चळ भक्ति ही सनातन आहे हे मूळ श्लोकांतील शब्दांचे सांगणे आहे. म्हणूनच सनातन भक्ति मी सविस्तर सांगितली.
क्रमशः







