इंग्लंडच्या वनडे संघाची घोषणा
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारताविरुद्ध होणाऱया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली असून जखमी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला त्यातून वगळण्यात आले आहे. मंगळवारपासून पुण्यामध्ये या मालिकेला प्रारंभ होणार आहे.
आर्चर या मालिकेतून माघार घेण्याची शक्यता असल्याचे इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने शनिवारीच म्हटले होते. वनडे मालिकेनंतर होणाऱया आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यातही तो भाग घेणार नसल्याचे त्याने म्हटले होते. त्याच्या हाताच्या कोपराला झालेली दुखापत चिघळली असल्याने त्याची निवड करण्यात आलेली नाही. ‘उजव्या हाताच्या पुढील तपासणीसाठी आर्चर मायदेशी परतणार आहे. तो वनडेसाठी अनफिट असल्याने आम्ही त्याची निवड केलेली नाही. 23, 26, 28 मार्च रोजी हे सामने होणार आहेत,’ असे ईसीबीने निवेदनाद्वारे सांगितले. टी-20 मालिकेत खेळलेले जेक बॉल, ख्रिस जॉर्डन, डेविड मलान या तिघांनाही जादा खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. ते संघासोबत पुण्याला रवाना झाले आहेत.
मलानचा विक्रम
नुकतीच झालेली पाच सामन्यांची टी-20 मालिका भारताने 3-2 अशा फरकाने जिंकली आहे. शेवटच्या सामन्यात मलानने टी-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम केला आहे. त्याने 24 डावात हा टप्पा गाठताना पाकच्या बाबर आझमचा 26 डावात हा टप्पा गाठण्याचा विक्रम मागे टाकला. कोहलीने 27, ऍरोन फिंचने 29 व केएल राहुलने 29 डावात हा टप्पा पूर्ण केला होता.
इंग्लंड वनडे संघ ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, बटलर, सॅम करण, टॉम करण, लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, जेसॉन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपली, मार्क वूड.









