प्रतिनिधी /मडगाव
मडगाव रेल्वे स्थानकावर 20 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल चोरल्याचा आरोप असलेल्या मूळ उत्तर प्रदेशातील सध्या शांतीनगर- मडगाव येथे राहात असलेल्या महम्मद अस्लम या 33 वर्षीय आरोपीला मडगावच्या न्यायालयाने दोषी ठरवून काल शुक्रवारी दोन महिन्यांची कैदेची शिक्षा ठोठावली.
या शिवाय या आरोपीने 2 हजार रुपयांचा दंड भरावा आणि दंडाची ही रक्कम न भरल्यास आरोपेने आणखी एका महिन्यांची कैदेची शिक्षा भोगावी असे न्या. अंकीता नागवेकर यांच्या न्यायालयाने आदेश दिला.
न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार 11 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3.50 वाजण्याच्या सुमाराला मडगाव रेल्वे स्थानकाच्या एक क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर 999398022 या क्रमांकाचा प्रशांत चौहान यांचा मोबाईल आरोपीने लंपास केला होता. या प्रकरणी प्रशांत चौहान याने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील सुनिता नागवेकर यांनी न्यायालयात काम पाहिले.









