12 माजी संचालकांचे पत्रकार बैठकीत आवाहन
प्रतिनिधी/गडहिंग्लज
आफ्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या संदर्भात केलेल्या आरोपावर बोलण्यासाठी चेअरमन श्रीपतराव शिंदे यांनी गडहिंग्लजच्या दसरा चौकात केव्हाही यावे. येथे आम्ही येण्यास तयार आहोत असे खुले आवाहन विरोधी 12 माजी संचालकांनी दिले आहे. दसरा चौकात येण्याचे धाडस दाखवल्यास अनेक कारणामे चर्चेत उघड करू असेही जाहीर केले आहे. गडहिंग्लज साखर कारखाना संचालक राजीनामा प्रकारानंतर आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडतो आहे.
आज माजी चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 12 माजी संचालकांनी पत्रकार बैठक घेवून चेअरमन शिंदे यांनी केलेले आरोप फेटाळत त्यांच्यावर जोरकस आरोप केले. 21 वर्ष आणि 30 वर्ष संचालक असणा-या ऍड. शिंदे यांनी कारखान्याची विस्तारीकरण अथवा आधुनिकरण केले नसल्याचे सांगत केवळ आर्थिक स्वार्थासाठी चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांनी कारखाना भाडेतत्वावर देण्यात अक्षम्य दिरंगाई केल्याची टिका केली आहे. माजी व्हा. चेअरमन प्रकाशराव चव्हाण यांनी आपण पैसाचा व्यवहार केला असे म्हणत असतील तर 12 संचालकांच्या बरोबर आपण उपस्थिती राहू. तेथे यावर खुले चर्चा करा असे आवाहन दिले. संचालक सतिश पाटील यांनी कामगारांच्या जीवावर राजकारण करणा-यांनी त्यांच्यावर गैरविश्वास केला. काटामारीचा कट रचला. त्याचे पाप त्यांना भोगावे लागेल. या पत्रकार बैठकीला विद्याधर गुरबे, दिपक जाधव, प्रकाश पताडे, अनंत कुलकर्णी, सुभाष शिंदे, सदानंद हत्तरकी, किरण पाटील, जयश्री पाटील, क्रांतीदेवी कुराडे यांच्या सहीचे पत्रक दिले आहे. यावेळी डॉ. अनिल कुराडे, मानसिकराव देसाई यांच्यासह अन्य उपस्थित होते.









