आढावा बैठकीत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची माहिती : जिल्हय़ासाठी 144 नव्या डॉक्टरांची नियुक्ती, चिकोडीत प्रयोगशाळेला मंजुरी
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसंख्येच्या आधारावर बेळगावला अतिरिक्त लस पुरविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबरोबरच कोरोना महामारी थोपविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबरोबरच ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. भविष्यात आरोग्य व शिक्षण क्षेत्र बळकट करण्यासाठी अतिरिक्त अनुदान देण्यात येईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले.
शुक्रवारी कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. सुवर्णविधानसौधमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व अधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. लोकसंख्येच्या आधारावर बेळगावला जादा लस पुरविण्यात येणार आहेत. यासंबंधी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्थानिक समस्यांवर येथेच तोडगा काढा
कोरोना परिस्थितीची हाताळणी असो किंवा इतर स्थानिक समस्या असोत, पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी चर्चा करावी. स्थानिक समस्यांवर येथेच तोडगा काढण्यात यावा. कोणत्याही समस्या असो किंवा सूचना, सल्ला असो पालकमंत्र्यांशी चर्चा करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रादेशिक आयुक्तांवर बिम्स प्रशासक पदाची जबाबदारी
बिम्ससंदर्भातील तक्रारींची बैठकीत जोरदार चर्चा झाली. बिम्समधील परिस्थिती हाताळण्यासाठी प्रादेशिक आयुक्त आदित्य अमलान बिस्वास यांच्यावर प्रशासक पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. बिम्समध्ये कर्मचाऱयांची कमतरता आहे. त्यामुळे नियुक्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. 20 केएल ऑक्सिजन प्रकल्प स्थापन करण्यासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यास सरकार कमी पडणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला.
ऑक्सिजन बेडची सुविधा असणाऱया बसेस
तालुका इस्पितळांमध्ये व्हेंटिलेटर पडून आहेत. ते सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कृती करण्याची सूचना उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली. कोरोनाच्या तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी परिवहन मंडळाने 8 लाख रुपये खर्चाच्या ऑक्सिजन बेडची सुविधा असणाऱया बसेस तयार केल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली. आमदार-खासदारांनी आपल्या निधीतून या बसेस खरेदी करण्याचा विचार करावा, असे
सांगितले.
चिकोडीत प्रयोगशाळेला मंजुरी
चिकोडी येथे जिल्हा इस्पितळ सुरू करण्याची मागणी विधानपरिषदेचे मुख्यप्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी केली आहे. कोरोना चाचणी प्रयोगशाळाही सुरू करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. खासदार इराण्णा कडाडी यांनी जिल्हय़ात सात ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, असे सांगितले. खासदार मंगला अंगडी यांनी सरकारने नियुक्त केलेल्या डॉक्टरांना त्वरित सेवेत रुजू करून घेण्याची मागणी केली.
1172 गावांत कोरोना चाचणी
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले, दुसऱया लाटेत 41 हजार 544 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. चिकोडी येथे आरटीपीसीआर तपासणीसाठी केंदीय आरोग्य खात्याने मंजुरी दिली आहे. जिल्हय़ात तीन तालुक्मयांत रुग्णसंख्या वाढती आहे. 1300 पैकी 1172 गावांत कोरोना चाचणी करण्यात येत आहे. बिम्समध्ये सुविधा पुरविण्यासाठी शंभरहून अधिक कर्मचाऱयांना कंत्राटीपद्धतीवर नियुक्ती करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, लक्ष्मण सवदी, उमेश कत्ती, शशिकला जोल्ले, डॉ. के. सुधाकर, बसवराज बोम्मई, श्रीमंत पाटील, खासदार मंगला अंगडी, खासदार आण्णासाहेब जोल्ले, इराण्णा कडाडी, माजी खासदार प्रभाकर कोरे यांच्यासह जिल्हय़ातील आमदार उपस्थित होते.
व्हेंटिलेटर कार्यान्वित करा
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 30 हून अधिक व्हेंटिलेटर अद्याप पॅकबंद अवस्थेत आहेत. यासंबंधी ‘तरुण भारत’ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्ताचा उल्लेख करून आमदार अनिल बेनके यांनी याकडे मुख्यंमत्र्यांचे लक्ष वेधले. पॅकबंद अवस्थेतील व्हेंटिलेटर सुरू करण्यास सूचना देण्याची मागणी केली.
जून अखेरपर्यंत 58 लाख लस पुरवठा
जिल्हय़ात सात ऑक्सिजन प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहेत. याबरोबरच बेळगाव जिल्हय़ासाठी 144 नव्या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये 54 तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. संपूर्ण देशात कर्नाटकात सर्वात जास्त कोरोना चाचणी केली जात आहे. जून अखेरपर्यंत 58 लाख लस पुरवठा होणार आहेत. त्यामुळे लसींचा तुटवडा भासणार नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले. यावेळी आमदार सतीश जारकीहोळी यांनी कोरोना चाचणी वाढविण्याची मागणी केली.









