प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिह्यातील शासकीय स्वयंसेवी संस्था, कार्पोरेट क्षेत्र, आरोग्य विश्वाचे प्रतिबिंब आरोग्य दिनदर्शिकेत आहे. ती सर्वसामान्यांसह वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाला मोलाची ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी केले.
येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये आरोग्य दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले, जिह्यातील महात्मा फुले जनआरोग्य योजना, कर्नाटक श्री आरोग्य योजनांत सहभागी दवाखाने, ब्लड बँका, रुग्णवाहिका, लॅब, रुग्ण सेवेतील स्वयंसेवी संस्था, सर्पमित्र, आरोग्य स्वंयसेवकांचे मोबाईल नंबर आहेत. निवृत्त बँक अधिकारी सुहास जावडेकर, संकल्प थेरपीचे डॉ. पी. एन. कदम, आरोग्यमधील मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी, ऍड. विनय कदम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार आदींचे `कोरोना’ आणि बदलती जीवनशैली’वर लेख असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेंद्र मकोटे यांनी स्वागत केले. अमोल कुरणे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा एडस् नियंत्रण केंद्राच्या प्रमुख दीपा शिपूरकर, अभिजीत वायचळ, एकनाथ पाटील, बंटी सावंत, तुषार भिवटे, बरकत पन्हाळकर आदी उपस्थित होते. स्वागत मुल्याद्वारे येणाऱया रकमेतून अंध विद्यार्थ्यांना मदत केली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.









