मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आरोग्य, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना दिले निर्देश
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य आरोग्य खात्यातील कंत्राटी कर्मचाऱयांनी मागील 10 दिवसांपासून सुरू ठेवलेल्या आंदोलनाला यश मिळण्याची चिन्हे आहेत. कंत्राटी कर्मचाऱयांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासंबंधी आमदार आयनूर मंजूनाथ यांनी पाठविलेल्या पत्राची मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दखल घेतली आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर, आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांना कंत्राटी कर्मचाऱयांच्या मागण्यांबाबत लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी सूचना केली आहे.
आरोग्य खाते, वैद्यकीय शिक्षण खाते आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱया कंत्राटी व बाहय़ कंत्राटी कर्मचाऱयांनी मागील दहा दिवसांपासून संप पुकारला आहे. या कर्मचाऱयांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती करून संघटनेचे मानद अध्यक्ष आणि आमदार आयनूर मंजुनाथ यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठविले होते.त्यानुसार येडियुराप्पा यांनी आयनूर मंजुनाथ यांना प्रत्युत्तरदाखल पत्र पाठवून वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना मागण्यांसदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देत असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण खाते व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाऱया कर्मचाऱयांच्या संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वाराध्य यांनी प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने समाधानी आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार संबंधित मंत्र्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले.









