अधिकाऱयांना आली खडबडून जाग चार बालकांचे अहवाल तपासणीसाठी पाठविले
वार्ताहर/ किणये
हलगा येथील एका तेरा वषीय मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाल्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. मरगाई गल्लीतील हर्षदा भीमराव संताजी हिचा शुक्रवारी दुपारी एका खासगी इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यामुळे आता आरोग्य खात्याचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. गावात गेल्या पंधरा दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला आदी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. एका शालेय विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांना जाग आली असून शनिवारी दिवसभर गावात पाहणी केली.
येळ्ळूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रमेश दंडगी यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व ग्रा. पं. पीडीओ यांनी गावातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली. शुक्रवारी व शनिवारी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये चार बालकांचे ‘फिवर केस’ अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. रमेश दंडगी यांनी दिली आहे.
शनिवारी सकाळी जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. पल्लेद यांनी हलगा गावाला भेट देऊन नागरिकांची चौकशी केली व उपस्थित आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांना या गावातून डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण पूर्णपणे कमी कसे होईल, याबाबत काही सूचना केल्या. आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी गावातील प्रत्येक गल्ल्यांची पाहणी केली. नागरिकांच्या घरोघरी जाऊन लार्वा सर्व्हे व फिवर सर्व्हे केला. घराच्या आजूबाजूला असणारे टायर, बादल्या, रिकामी शहाळी आदी ठिकाणी डासांची उत्पत्ती होत आहे का? याबाबतची पाहणी केली.
हर्षदा भीमराव संताजी या शालेय विद्यार्थिनीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या सहा दिवसांपासून हर्षदावर खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र, उपचाराचा उपयोग न होता शुक्रवारी तिची प्राणज्योत मालवली. या घटनेने डेंग्यू रोगाबाबत हलगा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्षदाच्या बहिणीलाही डेंग्यूची लागण झाली होती. तिच्यावर उपचार होऊन ती सुखरुप घरी परतली आहे. मात्र, एका कन्येचा डेंग्यूमुळे बळी गेला असल्यामुळे संताजी कुटुंब शोकाकुल झाले आहे.
गावातील नागरिकांना ताप, सर्दी झाली आहे का? याचीही तपासणी करण्यात आली. ग्राम पंचायतीच्यावतीने जंतूनाशक औषधाची पुन्हा फवारणी करण्यात आली. नागरिकांनी आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, कोणत्याही भांडय़ात किंवा बकेटमध्ये पाणी अधिक दिवस साठवून ठेवू नये, तसेच आमचे कर्मचारी सर्वांची तपासणी करू लागले आहेत. पण कोरोना रोगाला घाबरून काही जण तपासणी करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. नागरिकांनीही आम्हाला पूर्णपणे सहकार्य करावे, असे डॉ. रमेश दंडगी यांनी सांगितले.
गावात जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली असून गावातील गल्ल्यांची साफसफाई करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी रोगप्रतिकारक औषधांचे पुन्हा वितरण करण्यात येणार असून ग्राम पंचायतीमार्फत गावातून डेंग्यू हद्दपार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती ग्रा. पं. अध्यक्ष गणपत मारिहाळकर यांनी दिली आहे.









