मुंबई/प्रतिनिधी
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपकडून घंटानाद आंदोलने करण्यात येत आहेत. भाजप गेल्याकाही दिवसांपासून मंदिरे उघडण्यासाठी सरकरला वारंवार धारेवर धरत आहे. पण मुख्यमंत्र्यांनी भाजपला वेळोवेळी राजकारण करू नका असा सल्ला दिला आहे. पण भाजप मंदिरे उघडण्याच्या मुद्यावर ठाम आहे. आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांच्या उपस्थितीत विरोधकांवर खोचक शब्दात टीका केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे नेते एका व्यासपीठावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याचा आग्रह करणाऱ्या भाजपला अप्रत्यक्षरित्या सुनावलं. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात भिवंडीतील बंद पडलेल्या आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीचा संदर्भ पकडत त्यांनी भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष कानपिचक्या दिल्या.
राज्यात आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक स्थळं उघडली पाहीजेत, हरकत नाही. कपिल पाटीलजी तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना, की त्याच्या बाजूला मी मंदिरं उघडू. आरोग्य केंद्र बंद करून. आज आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत. आपण घोषणा देताना भारत माता की जय, वंदे मातरम द्यायला चांगल्या आहेत. आम्हीही त्या घोषणा दिलेल्या आहेत. घोषणेच्या पुढे जात आम्ही हिंदुत्वाचं रक्षण केलेलं आहे. हे ९२-९३ साली दाखवून दिलेलं आहे.”, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितलं.