प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आणि सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून कोरोना व्हायरसच्या विरोधात लढत आहेत. शहरातील विविध प्रभागात ते दररोज सातत्याने स्वच्छता, औषध फवारणी आदी कामे करत आहेत. कोरोना विरोधातील ही लढाई त्यांच्या ही जीवावर बेतू शकते अशी परिस्थिती आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे सातारकरांचे कर्तव्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये कार्यरत असणाऱया आरोग्य कर्मचाऱयांना नगरसेवक प्रशांत आहेरराव आणि खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्यावतीने सॅनिटायझर, मास्क, हँडग्लोजचे वाटप करण्यात आले.
जगभरात कोरोना वेगाने पसरत आहे. भारतातील विविध राज्यांत कोरोनाची दहशत वाढू लागली आहे. अशा परिस्थितीतही विविध भागात सफाई कामगार आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून परिसर स्वच्छ राखण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत. सातारा नगरपालिका आणि येथील सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी त्याला अपवाद नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना दररोज नवीन मास्क, हॅन्डग्लोज आणि सातत्याने सॅनिटायझरचा वापर करावा लागत आहे. ही गरज ओळखून सातारा नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत आहेरराव यांनी आरोग्य कर्मचाऱयांना मास्क, हॅन्डग्लोज आणि सॅनिटायझर वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्याला त्यांच्या अन्य सहकाऱयांनी ही प्रतिसाद दिला आणि तत्काळ हे वाटप खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रशांत आहेरराव, जितेंद्र खानविलकर, विजय तावडे, संतोष पवार, आशुतोष निगडे तसेच सफाई कामगार आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.








