वार्ताहर/ राजापूर
कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाला आणण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱयांवर व त्यानंतर दाखल झालेल्या पोलीस पथकावर हल्ला करत वाहनांवर तुफान दगडफेक केल्याची घटना बुधवारी सकाळी साखरी नाटे परिसरात घडली आहे. जमावाच्या या हल्ल्यात आरोग्य कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱयाला किरकोळ दुखापत झाली आहे. कोरोना महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱया कर्मचाऱयांवर झालेल्या या हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत आहे.
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथे सोमवारी दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडले होते. त्यापैकी एकाचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या रूग्णांच्या संपर्कातील काही रूग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने बुधवारी सकाळी पॉझिटीव्ह रूग्णाला रूग्णालयात दाखल करण्यासाठी व सर्वेक्षणासाठी नाटे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱयांचे पथक साखरीनाटे येथे गेले होते. रूग्णाची माहिती घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱयांनी त्याच्या संपर्कात आलेल्या शेजारच्या लोकांची माहिती घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी तेथील महिला व पुरूषांनी माहिती देण्यास नकार देत आरोग्य कर्मचाऱयांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
त्यामुळे आरोग्य कर्मचाऱयांनी नाटे आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱयांसह नाटे पोलिसांना याबाबत माहिती दिली. नाटे पोलीस व आरोग्य अधिकाऱयांचे पथक साखरी नाटे येथे गेले असताना सुमारे 400 लोकांच्या जमावाने रस्ता अडवून गावात जाण्यास विरोध केला. यावेळी पोलिसांनी जमावाला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने पोलिसांनाच धक्काबुक्की करत जोरदार दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनासह आरोग्य खात्याच्या वाहनाच्या काचा फुटून नुकसान झाले. तसेच धक्काबुक्कीत पोलीस कर्मचारी व एका महिला आरोग्य कर्मचाऱयाला दुखापत झाल्याची माहिती पुढे आली आहे.
कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर आरोग्य कर्मचारी भितीच्या छायेखाली असून असे हल्ले होणार असतील तर कामबंद करण्याचा इशारा आरोग्य कर्मचाऱयांकडून देण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेताना जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. याबाबत नाटे पोलिसांशी संपर्क साधला असता सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसरात्र करणारे आरोग्य कर्मचारी तसेच पोलिसांवर झालेल्या या हल्ल्याचा तालुकाभरात तीव्र निषेध व्यक्त होत असून हल्ला करणाऱयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पॉझीटीव्ह रूग्ण घरीच
शेकडोंच्या जमावाने केलेल्या या हल्ल्यातंतर आरोग्य कर्मचारी व पोलीस जीव वाचवून तेथून माघारी परतले. त्यामुळे साखरी नाटेतील कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सायंकाळपर्यंत घरीच होता. साखरीनाटेतील तणावग्रस्त वातावरण आणि हल्ल्यामुळे साखरी नाटे येथे जाण्यास आरोग्य कर्मचारी तयार नसल्याने कोरोना पॉझिटीव्ह असलेला रूग्णाला घरातून बाहेर काढून कोविड केअर सेंटरमध्ये कसे दाखल करायचे असा प्रश्न प्रशासनासमोर होता.









