राजकीय स्वरूपाच्या आणीबाणीबद्दल नेहमीच चर्चा होत राहते. मात्र देशाच्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडून जेव्हा ‘आरोग्याविषयी आणीबाणी निर्माण झाली आहे’ असे शब्द बाहेर पडत आहेत आणि अमेरिकेचा 3 लाख 7 हजार रुग्ण हा एका दिवसाचा जागतिक विक्रम मोडत 3 लाख 14 हजार रुग्णसंख्येपर्यंत जेव्हा भारतासारखा देश पातळी गाठतो तेव्हा त्याचे आरोग्य आणीबाणी हेच समर्पक वर्णन असते. आता याला कोण जबाबदार किंवा त्याचा इतिहास काय याचा विचार करण्याची वेळ टळून गेली आहे. या संकटाला सामोरे कसे जायचे आणि त्यानिमित्ताने उद्भवणाऱया विविध समस्यांना स्वीकारून त्यावर मात कशी करायची याचा विचार करण्याची वेळ आहे. नाशिक येथे झालेल्या गॅस गळतीच्या दुर्घटनेत 24 लोकांनी हकनाक जीव गमावल्याच्या घटनेनंतर दुसऱयाच दिवशी पहाटेच्या सुमारास विरारमधल्या खाजगी कोविड रुग्णालयात मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणेचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पण संकटाच्या काळात घडणाऱया या घटना बऱयाचदा यंत्रणेवरील ताण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून घडत असतात. त्याबाबतीत एखाद दुसरी व्यक्ती दोषी ठरवणे मुश्कील होऊन जाते. देशभरात अशा अनेक दुर्घटना सातत्याने घडत आहेत. सामान्य माणसांचा जीव असा हकनाक जात असताना सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत असतो. मात्र यंत्रणांची या बाबतीतील उत्तरे साचेबद्ध असतात. त्यांना परिस्थिती व सर्व वास्तव स्पष्टपणे सांगता येत नाही आणि परिस्थितीत फार मोठा बदल घडवणेही अशा संकटकाळी शक्मय नसते. वाराणसीमध्ये बनारस हिंदू विद्यापीठाच्या रुग्णालयात मूत्रपिंड विकाराने त्रस्त असणारा एक युवक धाप लागून पायऱयांवर पडला. त्याची माता त्याच्या सोबत होती. लोक तिची विनंती ऐकत होते मात्र धाप लागलेला व्यक्ती कोरोनाबाधित असावा म्हणून कोणीही त्याला हात लावला नाही. ऑक्सीजन पुरवला नाही की अँब्युलन्स देऊन दुसऱया दवाखान्यात पाठवले नाही. काही लोकांनी दुरूनच हा कोरोना रुग्ण आहे, त्याला ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असे त्या मातेला सुचवले. एका रिक्षात त्याला बसवून ती दवाखान्याच्या दिशेने निघाली. मात्र रस्त्यातच त्या मुलाचा मृत्यू झाला. कोरोनाचा कोणताही पुरावा नव्हता मात्र मूत्रपिंडाच्या विकारावर डॉक्टर उपचार करत होते आणि त्यासाठी त्याला त्या दवाखान्यात बोलवण्यात आले होते. मात्र धाप लागल्यानंतर तो कोरोनाचाच रुग्ण आहे असे ठरवून कोणीही त्याला मदत केली नाही. उलट त्या मातेच्या असहाय परिस्थितीची छायाचित्रे काढून माध्यमांवर प्रसारित केली गेली. पंतप्रधानांच्या मतदारसंघात हे घडत असल्याने त्याला देशभर प्रसिद्धी मिळाली. पण त्या घटनेतील दाहकता मात्र या सर्वात कुठेतरी लपून गेली. दवाखान्यात असा रुग्ण तडफडत असताना वैद्यकीय क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीला त्याच्यासाठी काही करावेसे कसे वाटले नसेल? सर्वसामान्य व्यक्तींना कोरोनाची असलेली भीती आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना असलेले ज्ञान यांचा विचार केला तर ही घटना घडायला नको होती. मात्र परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली आहे की कोणीही धाडस करायला तयार नाही. बनारस विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यावर उत्तर देताना म्हणाले की, यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे अशा दुर्घटना घडतात. ऑक्सिजनच्या पुरवठय़ाच्या बाबतीतसुद्धा देशभर गंभीर परिस्थिती आहे. प्रत्येक जिह्याच्या प्रमुख अधिकाऱयांना ऑक्सिजन आणि रेमडेस्वीर इंजेक्शनची मागणी पूर्ण करताना दमछाक होऊ लागली आहे. अनेक ठिकाणाहून लोकांची होणारी मागणी, केल्या जाणाऱया विनंत्या यांना तोंड देऊन यंत्रणा अक्षरशः हतबल झाली आहे. जिह्याच्या नाक्मयांवर लोक ऑक्सिजनचे टँकर अडवून आपल्या जिह्यासाठी ते वापरावेत म्हणून आग्रह करत आहेत. वेळेत टँकर नियत ठिकाणी पोहोचले नाहीत तर त्या त्या जिह्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुखावर कारवाई होईल असा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने काहीही करा पण ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा कमी पडू देऊ नका, सरकार काही करू शकते हे दाखवून द्या असे यंत्रणांना सुचवले आहे. टाळेबंदी अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या निर्णयात न्यायालयाला हस्तक्षेप करायचा नाही. हे निर्णय आम्हाला राज्य सरकारवरच सोपवायचे आहेत अशी भूमिका न्यायालयाने घेतली आहे. प्रत्येकाच्या जबाबदाऱया यातून निश्चित होऊ लागल्या आहेत. कोरोना संकटकाळात या सर्व गोष्टींना पाठीवर टाकून पुढे जायची दुर्दैवी वेळ आलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत वाढती रुग्ण संख्या लक्षात घेतली तर कोणत्याही यंत्रणेवर दबाव वाढवता येणार नाही. खासगी हॉस्पिटलची यंत्रणा कशी होती याची चौकशी होऊ शकते. मात्र वाढत्या उकाडय़ाच्या काळात एखाद्या दवाखान्यातील अतिदक्षता विभागात असलेला ताण आणि त्यामुळे वातानुकूलित यंत्राचा स्फोट झाला असे निदर्शनास आले तर त्याचाही विपरीत परिणाम इतर दवाखान्यात यंत्रणा अधिक क्षमतेने वापरायची किंवा नाही याबाबत होऊ शकतो. परिणामी अधिकचे रुग्ण नाकारले जाण्याची भीती आहे. आज अनेक रुग्णालयात लोकांना जागा मिळेल तिथे उपचार केले जात आहेत. अशावेळी घडणाऱया दुर्घटना चिंता वाढवत राहतात. आपल्या व्यवस्थेने असे आव्हानच गेल्या आणि या वर्षात पाहिलेले नसल्याने हीच पहिली कसोटी ठरते आहे. अशा काळास आणीबाणी म्हणणे हे सर्वस्वी योग्य आहे. मात्र केवळ म्हणून हे संकट दूर होत नाही. वाढत्या रुग्ण संख्येचा अंदाज लागणे मुश्किल बनले आहे. परिणामी यंत्रणेवर ताण वाढतच आहे. त्याचा विचार करता या रुग्णात आपण असता कामा नये यासाठी आपला आणि परिवाराचा बचाव करणे आणि समाजावरील संकट व्यक्तिगत प्रयत्नाने दूर करणे या व्यतिरिक्त सामान्य लोकांच्या हाती काही नाही. यंत्रणेला समाजाचा चांगला प्रतिसाद हा देखील मोठा दिलासा ठरू शकतो.
Previous Articleएचडीएफसी बँकेची 19 शहरांमध्ये मोबाईल एटीएम सेवा
Next Article निवडणूक आयोगाचे कठोर दिशानिर्देश
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








