ऑनलाईन टीम / पुणे :
गणेशोत्सव आणि दत्तजयंती यापूर्वी मोठ्या थाटात साजरी केली जात होती. परंतु २ वर्षे कोरोनामुळे यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आपल्याला यापुढे देखील जीवनशैली बदलावी लागणार आहे. भविष्यात मंदिरात हजर राहून प्रत्येक वेळी आपल्याला उपस्थित राहता येईलच, असे नाही. त्यामुळे सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने ऑनलाईन सुविधांवर भर असणे स्तुत्य असल्याचे मत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिराच्या १२४ व्या वर्षी मंदिराच्या वेबसाइटचे उद्घाटन दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते दत्तभवन येथे करण्यात आले. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख अॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, अॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. यावेळी पूर्व विभागाचे सहपोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे व परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्याकडे पोलिसांकरिता आरोग्य सुरक्षा किट सुपूर्द करण्यात आले. हिमांशू रत्नपारखी यांनी वेबसाईटचे डिझाईन केले आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, सुमारे ३५-३६ वर्षांपासून माझा दगडूशेठ गणपती व दत्तमंदिर या देवस्थानांशी संबंध आहे. दगडूशेठचे गणपती बाप्पा आणि दत्त महाराजांचे आशीर्वाद घेऊनच मी काम करत आलो आहे. धार्मिक कामासोबतच सामाजिक बांधिलकी स्वीकारून देवस्थानाच्यावतीने मदत केली जाते. दत्त महाराज हे गुरूंची अनुभूती देतात, त्यातून वेगळीच ऊर्जा तयार होते. कोविडच्या काळात दोन वर्षे पोलिस रस्त्यावर उतरून काम करत आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे अनेक पोलिस तणावाखाली आहेत, त्यांच्या या कामासाठी समाज पोलिसांप्रती कृतज्ञ आहे, हे ट्रस्टने केलेल्या मदतीतून दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. पराग काळकर म्हणाले, ट्रस्टच्या संकेतस्थाळामध्ये लाईव्ह दर्शन, नित्य उपक्रम, दत्त संप्रदाय व दत्तमंदिराचा इतिहास, सामाजिक उपक्रम व सर्व धार्मिक सेवांचा अंतर्भाव असणार आहे. यामुळे देश विदेशातील भाविक ट्रस्टशी जोडले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.