‘कोविड -19’चे संक्रमण आपल्या सर्वांनाच चांगले-वाईट अनुभव देत आहे. या वैश्विक संकटात राखेतूनही पुन्हा उभे राहण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘कॅप्टन सर टॉम मूर’ यांनी केले आहे. एप्रिल 2020 मध्ये कॅप्टन मूर यांनी वयाची 99 वर्ष पूर्ण करून शंभरीकडे वाटचाल केली आहे. 100व्या वाढदिवसापर्यंत ‘कोविड-19’ ग्रस्त लोकांकरिता एक हजार डॉलरचा निधी जमा करून ‘राष्ट्रीय आरोग्य सेवे’ (एन एच एस) ला सुपूर्त करण्याचा निर्धार त्यांनी सुरुवातीला केला होता. ‘एनएचएस’ ही इंग्लमधील लोकसहभागातून जमा झालेल्या निधीचा, लोकांच्या आरोग्यासाठी वापर करणारी यंत्रणा आहे. कॅप्टन टॉम यांनी निर्धारित केलेले एक हजार डॉलर निधी जमा करण्याचे ध्येय आज जवळपास चार कोटी डॉलर्सपर्यंत येऊन पोहोचले आहे. या वयात त्यांनी केलेले हे विस्मयकारी कार्य पाहून त्यांच्यासाठी अनेकांनी हृदयाची दारे किलकिली केली आहेत. ‘कॅप्टन टॉम’ या नावाने जगभरात ते सर्वांना परिचित झालेले आहेत. ‘कोविड-19’ संक्रमणाच्या काळात एकाकी पडलेल्या वृद्धांना आधार देण्यासाठी त्यांनी ‘संवाद शृंखला’ (पॉडकास्ट सिरीज) सुरू केली आहे. वृद्धापकाळात भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठीचा हा उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत ते अनेक वृद्धांशी बोलले आहेत. अगदी अलीकडे, एक ऑक्टोबर रोजी झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिनी’ जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेडरोस यांनी त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली होती. आपल्याकडे ‘वृद्धांच्या काळजी’ (जेरियाट्रीक केअर) ची समस्या अलीकडे वाढीस लागली आहे. पाश्चात्य देशांच्या तुलनेमध्ये आपल्याकडे ‘कुटुंब’ संस्थेची मुळे घट्ट असल्यामुळे, लहानांपासून वृद्धांपर्यंत कुटुंब, नातेवाईक, शेजारी हे सामाजिकरणाच्या प्रक्रियेत आधारवड राहिलेले आहेत. पाश्चात्य देशांमध्ये याचा अभाव असल्या कारणाने वृद्धापकाळातील समस्या अधिक असल्याचे पहायला मिळते. जसजसे सामाजिक माध्यमांचा सुळसुळाट झाला आहे तसतसे हे लोण आपल्याकडेही पसरू लागले आहे. टोकाची ‘आत्मकेंद्री’ वृत्ती आपल्याला विचार करायला लावणारी आहे. शहरांच्या तुलनेत खेडय़ांमध्ये वद्ध लोकांचे समाजातील समायोजन आणि जगण्याची उर्मी अधिक चांगल्या पातळीवर असल्याचे काही अभ्यासातून निर्दशनास आलेले आहे. शहरातील फ्लॅट संस्कृतीमध्ये वृद्धांच्या भावनांचा कोंडमारा होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. कोविड-19 संक्रमणाच्या संकटाने त्यात अधिकच भर टाकली आहे. वृद्धांमधील एकाकीपणा अधिक तीव्रतेने वाढू लागला आहे. वृद्धावस्थेत असलेल्या व्याधी आणि त्यात बाहेर पडल्यास कोरोना संक्रमणाची भीती यामुळे वृद्ध व्यक्ती वर्तमानकाळात हवालदिल झाल्या आहेत. भावनांचा निचरा होणाऱया जागा सध्या त्यांच्यासाठी बंद झाल्याने भीती, चिंता, नैराश्याने त्यांना वेढलेले आहे.
कोरोना संक्रमणातून ‘वृद्धांची काळजी’ हा आणखी एक धडा आपल्या सर्वांनाच घ्यावा लागणार आहे. ‘आरोग्यदायी वृद्धापकाळ दशक’ या संकल्पनेवर आताच कृतीशील पावले उचलली तर भविष्यात वृद्धांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांची गुंतागुंत कमी होण्यास मदत होईल. वृद्धापकाळात माणसे जेव्हा नाष्क्रिय, दुर्लक्षित होतात तेव्हा त्यांच्यातील एकटेपणा अधिक वाढीस लागतो. अशा वृद्ध व्यक्ती ‘विस्मृती’ (डिमेन्शिया) आजाराच्या प्राधान्याने बळी ठरतात. आज आपल्याकडे अशा रुग्णांचे प्रमाण हे चाळीस लाखांच्या जवळपास आहे. ‘वृद्धांच्या समायोजना’ची धोरणात्मक आणि सामाजिक पातळीवर दखल न घेतली गेल्यास 2030 पर्यंत डिमेन्शियाचे प्रमाण दुप्पट होण्याची भीती आहे. यासाठी वृद्धांच्या सामाजिक समायोजनाच्या प्रारुपाचे जाळे विणले जाणे गरजेचे आहे. भारतीय कुटुंब आणि समाज रचना हा खरेतर अशा प्रारुपासाठी आदर्श वस्तुपाठ ठरेल. आरोग्यदायी वृद्धापकाळासाठी सर्वप्रथम वृद्ध व्यक्तींच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता होणे गरजेचे आहे. आपल्याकडे विभक्त कुटुंब पद्धती वाढीस लागली आहे, तरीही जे÷ व्यक्तींना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. त्यांचा स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची त्यामुळे दखल घेतली जाते.
शारीरिक हालचालींवरील निर्बंध ही वृद्धापकाळातील एक मोठी समस्या आहे. अधिकतर ती चुकीच्या जीवनशैलीमुळे कमी वयातच सुरू होते. ज्ये÷ व्यक्तींनी नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाल ठेवल्यास त्याची तीव्रता आणि गोळय़ांचा भडिमार कमी करता येऊ शकतो. आपल्याकडील दर महिन्याचे सणवार हे सामाजिकीकरणाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. याशिवाय लग्नकार्य, मुंज, बारसे, गृहप्रवेश यासारखे समारंभ नात्यांना बळकटी देण्यासोबतच जगण्याला नवीन ऊर्जा देत असतात. अशा कार्यक्रमांतून वृद्धांच्या सर्वांशी गाठीभेटी होत असतात. त्यामुळे त्यांचे भावनिक-मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असते. खेडय़ापाडय़ातील महिला सामूहिकरित्या वाळवण (पापड, सांडगे) करणे, पंगतीचे जेवण बनविणे, सप्ताहात वारकऱयांना जेऊ घालणे आदि सामाजिक कार्यात समरसून सहभागी होतात. या चांगल्या प्रथांना तिलांजली देत आपण जितके अधिक आत्मकेंद्रीत होत जाऊ, वृद्धापकाळातील समस्यांना आपल्याला तितक्मया अधिक तीव्रतेने सामोरे जावे लागेल. नवीन तंत्रज्ञान शिकून घेणे ही वृद्धापकाळाची गरज ठरली आहे. सध्या टेलिव्हिजनवर झळकणारी ‘व्हॉट्सअप’ची जाहिरात ‘अपनासा लगता हैं अपनों के बीच’ ही जाहिरात त्याचे बोलके उदाहरण आहे. यासोबतच आपले छंद जोपासत, कौशल्ये विकसीत करत, आपल्या अनुभवची, ज्ञानाची शिदोरी सर्वांसाठी खुली करत, वृद्धापकाळ अधिक आनंदी, समाधानी होऊ शकतो. 2050 पर्यंत जगातील दर पाच व्यक्तींमागील एक व्यक्ती ही साठ वर्षांपुढील असणार आहे. ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’ (10 ऑक्टोबर)च्या निमित्ताने, वृद्धांच्या भावनिक-मानसिक आरोग्य जपणुकाचा संकल्प ‘आरोग्यदायी वृद्धापकाळ दशका’ची वाटचाल सुकर करण्यास निश्चितच सहाय्यभूत ठरेल.
डॉ. स्वाती अमराळे-जाधव








