कशेडी घाटात भोगावनजीकची घटना, 8 वर्षिय चिमुरडय़ाचा मृत्यू, ट्रेकरच्या मदतकर्त्यांसह पोलीस यंत्रणांचे तासभर बचावकार्य
प्रतिनिधी / खेड
मुंबई-विरारहून कणकवलीला जाणारी चिंतामणी कंपनीची खासगी आरामबस गुरूवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भोगावनजीकच्या दरीत कोसळली. अपघातात साई राजेंद्र राणे (8, फणसगाव-सिंधुदुर्ग) या चिमुरडय़ाचा जागीच मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले. स्थानिक ट्रेकरच्या मदतकर्त्यांसह पोलीस यंत्रणांच्या एक तासाच्या बचावकार्यानंतर 20 फूट खोल दरीतून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
वासुदेव तुकाराम शेलार (70, करमरकरवाडी-कणकवली), आशा अशोक लोटणकर (35, राजापूर), विनिता विजय प्रभू (56, तरळे-कणकवली), श्रीकृष्ण वासुदेव राहुल (36, कणकवली), प्रमोद विठ्ठल मोहिते (45, संगमेश्वर), विठ्ठल शिवराम शिगवण (77, संगमेश्वर), गंगाराम गोपाळ पडवळ (65, संगमेश्वर), सुमित्रा गंगाराम पडवळ (60, संगमेश्वर), चंद्रप्रिया विठ्ठल शिगवण (38, संगमेश्वर), राकेश मनोहर भालेकर (32, खेड), रिया राजेंद्र करमरकर (30, राजापूर) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारार्थ पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
चालक प्रणित चंद्रकांत चव्हाण (32, जोगेश्वरी-मुंबई, मूळगाव आरवली-संगमेश्वर) हा ताब्यातील चिंतामणी कंपनीच्या एमएच 48/के 4237 क्रमांकाच्या आरामबसमधून 27 प्रवाशांना घेऊन विरार येथून कणकवलीच्या दिशेने जात होता. कशेडी घाटातील भोगावनजीक आला असता रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बस चालवत असताना ताबा सुटून बस 20 फूट दरत कोसळली.
अपघाताचे वृत्त कळताच कशेडी येथील वाहतूक पोलीस उपनिरीक्षक बोडकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल कुरधुंडकर, मोरे, पोलीस नाईक मोहिते, पोलीस शिपाई पवार, चालक दुर्गावले यांच्यासह स्थानिक मदतकर्ते घटनास्थळी पोहचले. महाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी तांबे, पोलादपूर येथील पोलीस यंत्रणाही तातडीने घटनास्थळी दाखल झाली. दरीत कोसळलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक ट्रेकरना पाचारण करण्यात आले. तब्बल 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर जखमींना बाहेर काढण्यात यश आले.









