बेळगाव / प्रतिनिधी
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मूल्यमापन कुलसचिवांची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या परीक्षांच्या गोंधळामुळे ही बदली झाली असल्याची चर्चा सुरू आहे.
डॉ. एस. एम. हुरकडली हे मूल्यमापन कुलसचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी हुबळी येथील बी. व्ही. बुमरेड्डी तांत्रिक कॉलेजचे डॉ. वीरनगौडा पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच ते चन्नम्मा विद्यापीठामध्ये दाखल होणार आहेत. बदलीचा आदेश राज्यपालांच्यावतीने उच्चशिक्षण विभागाचे मुख्य सचिव महेश आर. यांनी दिला आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठ नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहे. कुलगुरुंची नेमणूक असो वा परीक्षांमधील गोंधळ यामुळे विद्यापीठ अडचणीत सापडत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे नवीन कुलसचिव तरी हा गोंधळ थांबवतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









