सुवर्णपदक मिळविलेल्या विद्यार्थिनीच्या पालकांचा संताप
प्रतिनिधी / बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्यावतीने (आरसीयु) पदवीदान समारंभ पार पडला. मात्र सुवर्णपदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकच देण्यात आले नाही. यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून विद्यार्थ्यांच्या मनाला चटका लावणारी ही बाब आहे. याचबरोबर कुलगुरु प्रा. एम. रामचंद्रगौडा हे विद्यार्थ्यांच्या पालकांना उध्दट उत्तरे देत आहेत. त्यामुळे आता त्याविरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचे सुवर्णपदक मिळविलेल्या सृष्टी ज्ञानी हिचे वडील गुरु अमरेंद्र ज्ञानी यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत त्यांनी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातील सावळय़ा गोंधळाची माहिती दिली. या विद्यापीठातील 99 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक, रजत पदक मिळविले होते. या पदवीदान समारंभासाठी विद्यार्थ्यांकडून 1600 रुपये शुल्क घेतले होते. मात्र आता या सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना केवळ 1 हजार 70 रुपयांचा डीडी देण्यात आला आहे.
पदवीदान समारंभामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश नाकारण्यात आला. सुवर्ण पदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना हा पदवीदान समारंभ पहायचा होता. मात्र तो क्षण मिळालाच नाही. कुलगुरु प्रा. एम. रामचंद्रगौडा यांना याबाबत विचारले असता, निधी नाही. त्यामुळे आम्ही सुवर्णपदक देवू शकत नाही, असे सांगितले. यावरुन विद्यार्थ्यांच्याबाबत या विद्यापीठाचे मानसिकता किती खालच्या पातळीची आहे, हे दिसून येत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
आता मी गप्प बसणार नाही तर त्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. मुलगी सृष्टी ज्ञानी हिने बीएमध्ये स्वतंत्र पदक मिळविले. याचबरोबर प्रल्हाद पुजारी याने एमएमध्ये सुवर्णपदक मिळविले. त्यांना सुवर्णपदक देणे गरजेचे होते. मात्र सुवर्णपदक देण्यात आले नाही. अनेक विद्यार्थ्यांना हे पदक दिले नसल्यामुळे ते विद्यार्थी नाराज आहेत. त्यामुळे आता त्याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महिला आयोगाला देखील पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.









