वृत्तसंस्था / अबु धाबी
वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला संघात उशिराने संधी मिळाली असली तरी त्याच्या आगमनामुळे कोलकाता नाईट रायडर्सला नवी ताकद मिळाली असून बुधवारी आयपीएलमधील त्यांचा सामना कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात या दोन संघांत झालेली लढत आरसीबीने जिंकली होती. त्या पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न या सामन्यात केकेआर करणार आहे. सायंकाळी 7.30 पासून सामन्याला सुरुवात होईल.
केकेआरला फर्ग्युसनची कुवत समजण्यासाठी नेतृत्वातील बदल आणि 9 सामने लागले. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संधी मिळाल्यावर त्याने वेग आणि वैविध्याच्या बळावर सनराजयर्स हैदराबादला जोरदार दणका दिला. त्या सामन्यात त्यांच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली असली तरी फर्ग्युसनने 4 षटकांत केवळ 15 धावा देत 3 बळी मिळविले आणि सुपरओव्हरमध्ये 3 चेंडूत 2 धावांत 2 बळी मिळविले. गेल्या मोसमात त्याला अशी चमक दाखविता न आल्याने त्याला पाच सामन्यात केवळ 2 बळी मिळविता आले होते. यावेळी त्याने पहिल्या चेंडूपासूनच सनरायजर्सवर वर्चस्व गाजविले. त्याने त्याचा राष्ट्रीय संघातील सहकारी व कर्णधार केन विल्यम्सनचा बळीही मिळविला. वेग आणि स्लोअरवनचे अप्रतिम मिश्रण करीत त्याने प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणले होते.
केकेआर 9 सामन्यात 10 गुण मिळवित चौथ्या स्थानावर असून त्यांचे अद्याप पाच सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी त्यांना उर्वरित सामन्यात प्रयत्न करावे लागणार आहेत आणि यासाठी त्यांनी फर्ग्युसनकडून अशाच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा केली आहे. त्याचा जोडीदार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडून फारशी उठावदार कामगिरी झालेली नसून त्याने 9 सामन्यांत 3 बळी मिळविले आहेत. त्यामुळे फर्ग्युसनच्या कामगिरीवरच केकेआरचे प्लेऑफचे भवितव्य अवलंबून असणार आहे. डीव्हिलियर्सने 33 चेंडूत नाबाद 73 धावा झोडपल्यानंतर केकेआरला आरसीबीविरुद्ध 82 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. डीव्हिलियर्स, कोहली, फिंच यांच्याविरुद्ध फर्ग्युसनचा वापर कर्णधार मॉर्गन कसा करतो हे पहावे लागेल.
फर्ग्युसनच्या समावेशाने केकेआरला संजीवनी मिळाली असली तरी त्यांचा स्टार अष्टपैलू आंदे रसेलचा फलंदाजीतील फ्लॉप शो अजूनही थांबलेला नाही. मागील आवृत्ती गाजवलेल्या रसेलला यावेळी 9 सामन्यांत केवळ 92 धावा जमविता आल्या आहेत. उसळत्या चेंडूवरील त्याचा कच्चा दुवा प्रतिस्पर्ध्यांनी हेरला असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय क्षेत्ररक्षण करताना त्याला किरकोळ दुखापतही झाली असल्याने या सामन्यात कदाचित त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. सुनील नरेनच्या ऍक्शनवरील आक्षेप दूर झाला असल्याने त्याला संघात स्थान दिले जाते का, हे पहावे लागेल. आठ सामन्यात संघाबाहेर ठेवल्यानंतर कुलदीपला संधी मिळाल्यावर त्याने दुसरा स्पिनर वरुण चक्रवर्तीसमवेत बऱयापैकी फिरकी मारा केला आहे.
राजस्थान रॉयल्सवर विजय मिळविल्यानंतर आरसीबी 10 गुणांसह तिसऱया स्थानावर पोहेचले असून रॉयल्सविरुद्ध 178 धावांचा पाठलाग करताना डीव्हिलियर्सने एकहाती विजय मिळवून देत 22 चेंडूत नाबाद 55 धावा झोडपल्या होत्या. केकेआरवर दुसरा विजय मिळवित प्लेऑफच्या आशा बळकट करण्याचाच कर्णधार कोहलीचा या सामन्यात प्रयत्न असेल.
संघ : केकेआर : इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक रसेल, नागरकोटी, कुलदीप, फर्ग्युसन, नितिश राणा, पी. कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नरेन, कमिन्स, व्ही. चक्रवर्ती, बॅन्टन, त्रिपाठी, ग्रीन, एम.सिद्धार्थ, निखिल नाईक, अली खान.
आरसीबी : कोहली (कर्णधार), डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल, फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी, स्टीन, पवन नेगी, उदाना, दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंग, मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, ऍडम झाम्पा.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.









