आयपीएल टी-20 साखळी सामना : आघाडी, मध्यफळीतील बहुतांशी फलंदाजांची हाराकिरी, मॉर्गन, फर्ग्युसनचा किंचीत प्रतिकार, सिराजचे 3 तर चहलचे 2 बळी
वृत्तसंस्था / अबु धाबी
मोहम्मद सिराज (8 धावात 3 बळी) व यजुवेंद्र चहल (15 धावात 2 बळी) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर चांगलीच भंबेरी उडालेल्या कोलकाता नाईट रायडर्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला. केकेआरला निर्धारित 20 षटकात 8 बाद 84 अशा अतिशय किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. त्यानंतर आरसीबीने 13.3 षटकातच विजयाचे लक्ष्य गाठले. केकेआरतर्फे कर्णधार इयॉन मॉर्गन (34 चेंडूत 30) व लॉकी फर्ग्युसन (नाबाद 19) यांनाच थोडाफार प्रतिकार करता आला.
विजयासाठी 85 धावांचे किरकोळ आव्हान असताना आरसीबीतर्फे पडिक्कल (25) व फिंच (16) यांनी 46 धावांची सलामी दिली. डावातील 7 व्या षटकात हे दोघेही बाद झाले. पण, त्यानंतर तिसऱया स्थानी बढतीवर आलेला गुरकिरत (नाबाद 21) व कर्णधार विराट कोहली (नाबाद 18) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
केकेआरची निराशा
तत्पूर्वी, केकेआरने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, आघाडी व मध्यफळीतील जवळपास सर्वच फलंदाज सपशेल लोटांगण घालत परतत राहिल्याने केकेआरचा डाव सातत्याने कोसळत राहिला होता.
सिराजने दुसऱया षटकातील तिसऱया चेंडूवर राहुल त्रिपाठीला (5 चेंडूत 1)डीव्हिलियर्सकरवी झेलबाद केले आणि इथून केकेआरच्या पडझडीला सुरुवात झाली. ब्लफमास्टर नितीश राणा (1 चेंडू, 0 धावा) याच षटकातील पुढील चेंडूवरच त्रिफळाचीत झाला. चेंडू स्विंग होत यष्टीवर येऊन आदळला आणि राणा त्याकडे हताशपणे पाहण्यावाचून काहीही करु शकला नाही.
या हंगामात दुसऱया टप्प्यात खराब फॉर्ममधून जात असलेला शुभमन गिल (6 चेंडूत 1) हा सैनीचा बळी ठरला. त्याने मॉरिसकडे सोपा झेल देत तंबूचा रस्ता धरला. आऊटसाईड ऑफस्टम्पवरील चेंडूवर पूल मारण्याच्या प्रयत्नात त्याच्याकडून चूक झाली. शुभमन बाद झाला, त्यावेळी केकेआरची 3 बाद 3 अशी दाणादाण उडाली आणि यानंतरही पडझडीचा हा सिलसिला सुरुच राहिला.
टॉम बॅन्टमने (8 चेंडूत 10) देखील सिराजच्या गोलंदाजीवर यष्टीमागे डीव्हिलियर्सकडे झेल दिला तर मॉर्गनपेक्षा वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असलेल्या दिनेश कार्तिकने (14 चेंडूत 4) पुन्हा एकदा निराशा केली. केकेआरच्या या साऱया पडझडीत केवळ अनुभवी कर्णधार इयॉन मॉर्गननेच थोडाफार प्रतिकार केला. त्याने 34 चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक नाबाद 30 धावांचे योगदान दिले. त्याच्या खेळीत 3 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला.
हंगामातील सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्सने 14 चेंडू खेळून काढत 4 धावा केल्या. कुलदीप यादवने 19 चेंडूत 12 धावा जमवत डाव सावरण्याचा किंचीत प्रयत्न केला होता. पण, नंतर तो डावातील शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला.
केकेआरचा 9 वा फलंदाज लॉकी फर्ग्युसन 16 चेंडूत 19 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीत एका चौकाराचा समावेश राहिला.
केकेकआरच्या डावाला सुरुंग लावण्यात सिराज व यजुवेंद्र चहल यांचा वाटा सर्वाधिक राहिला. सिराजने 4 षटकात अवघ्या 8 धावा देत 3 तर चहलने 4 षटकात 15 धावात 2 बळी घेतले.
दाखवला. सैनी व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
धावफलक
केकेआर : शुभमन झे. मॉरिस, गो. सैनी 1 (6 चेंडू), राहुल त्रिपाठी झे. डीव्हिलियर्स, गो. सिराज 1 (5 चेंडू), राणा त्रि. गो. सिराज 0 (1 चेंडू), बॅन्टॉन झे. डीव्हिलियर्स, गो. सिराज 10 (8 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), कार्तिक पायचीत गो. चहल 4 (14 चेंडू), मॉर्गन झे. गुरकिरत, गो. वॉशिंग्टन 30 (34 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), कमिन्स झे. पडिक्कल, गो. चहल 4 (17 चेंडू), कुलदीप यादव धावचीत (गुरकिरत-मॉरिस) 12 (19 चेंडूत 1 चौकार), लॉकी फर्ग्युसन नाबाद 19 (16 चेंडूत 1 चौकार). अवांतर 3. एकूण 20 षटकात 8 बाद 84.
आरसीबी : पडिक्कल धावचीत (कमिन्स) 25 (17 चेंडूत 3 चौकार), फिंच झे. कार्तिक, गो. फर्ग्युसन 16 (21 चेंडूत 2 चौकार), गुरकिरत नाबाद 21 (26 चेंडूत 4 चौकार), विराट नाबाद 18 (17 चेंडूत 2 चौकार). अवांतर 5. एकूण 13.3 षटकात 2 बाद 85.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-46 (फिंच, 6.2), 2-46 (पडिक्कल, 6.4).
गोलंदाजी : कमिन्स 3-0-18-0, प्रसिद्ध कृष्णा 2.3-0-20-0, चक्रवर्ती वरुण 4-0-28-0, फर्ग्युसन 4-0-17-1.









