आयपीएल साखळी फेरीत आज गुजरातला मोठय़ा फरकाने नमवण्याची गरज
मुंबई / वृत्तसंस्था
आयपीएल साखळी फेरी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना प्ले-ऑफमधील उर्वरित जागांसाठी रस्सीखेच देखील रंगत आली असून आज (गुरुवार दि. 19) आरसीबीसमोर गुजरात टायटन्सचे कडवे आव्हान असणार आहे. आरसीबीला प्ले-ऑफसाठी आशाअपेक्षा कायम राखण्यासाठी एकीकडे गुजरातला मोठय़ा फरकाने नमवावे लागेल आणि दुसरीकडे, अन्य सामन्यातील निकाल आपल्याला अनुरुप असतील, अशी अपेक्षाही करावी लागेल. आरसीबीसाठी खराब रनरेट ही देखील आणखी एक चिंता ठरली आहे.
गुजरातसाठी यंदाचा आयपीएल हंगाम आतापर्यंत स्वप्नवत ठरत आला असून 13 सामन्यात 20 गुणांसह त्यांनी प्ले-ऑफमधील स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे. दुसरीकडे, आरसीबीसाठी यंदाचा हंगाम संमिश्र स्वरुपाचा राहिला असून ते 7 विजय व 6 पराभवांसह पाचव्या स्थानी आहेत. आतापर्यंत त्यांनी 13 सामन्यात 14 गुण मिळवले आहेत. मात्र, -0.323 हा खराब रनरेट त्यांच्या मार्गातील आणखी एक मोठा अडसर आहे.
सध्या चौथ्या स्थानी विराजमान असलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवून शकला तर त्यांचेही 16 गुण होतील आणि रनरेटच्या निकषावर ते आरसीबीपेक्षा बरेच पुढे असल्याने याचा त्यांना लाभ होईल. आरसीबीने यापूर्वी लागोपाठ विजय मिळवत आगेकूच कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागील लढतीत पंजाब किंग्सकडून 54 धावांनी पत्करावा लागलेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा ठरला.
विराट कोहलीचा खराब फॉर्म अद्याप कायम असून मागील सामन्यात त्याला केवळ 20 धावा जमवता आल्या. आरसीबीला नशिबाची साथ लाभण्यासाठी विराटला सूर सापडणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे. मागील काही सामन्यात निष्प्रभ ठरत आलेले कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक येथे मोठी खेळी साकारण्यासाठी महत्त्वाकांक्षी असतील. ग्लेन मॅक्सवेल व रजत पाटीदार यांनी आश्वासक सुरुवात केली असली तरी याचे ते मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकलेले नाहीत.
गोलंदाजीच्या आघाडीवर, हर्षल पटेल व वणिंदू हसरंगा यांनी उत्तम कामगिरी केली आहे. मागील सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी मात्र या दोघांचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. जोश हॅझलवूड व सिराज यांच्या फॉर्मची आरसीबीला येथेही चिंता असेल. या प्रतिकूल स्थितीतही आरसीबीचा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसला संघ मुसंडी मारण्याची अपेक्षा आहे.
संभाव्य संघ
गुजरात टायटन्स ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकिरत सिंग, बी. साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवातिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमनुल्लाह गुरबाझ, वृद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नळकांडे, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप संगवान, रशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, वरुण ऍरॉन, यश दयाल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर ः फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हॅझलवूड, शाहबाज अहमद, अनूज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रुदरफोर्ड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
आज पराभव झाला तरी गुजरात गुणतालिकेत ‘टॉप’वरच राहणार
या हंगामात सर्वोच्च बहरात असलेला गुजरातचा संघ 20 गुणांसह अव्वलस्थानी विराजमान आहे. प्ले-ऑफसाठी सहज स्थान निश्चिती केल्यानंतर देखील त्यांनी आपला विजयी धडाका कायम राखला असून यामुळे त्यांचा ‘रेड हॉट’ फॉर्म लक्षवेधी ठरत आला आहे. 13 पैकी 10 सामने जिंकले असल्याने आज एखाद वेळेस पराभवाचा सामना करावा लागला तरी गुणतालिकेत ते अव्वलस्थानीच कायम राहणार, हे निश्चित आहे.
गुजरात टायटन्ससाठी सांघिक खेळ हे बलस्थान ठरत आले असून याच जोरावर त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर साम्राज्य गाजवले आहे. वृद्धिमान साहा, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, कर्णधार हार्दिक पंडय़ा व राहुल तेवातिया यांच्यामुळे फलंदाजीत वरचष्मा गाजवण्यात हा संघ यशस्वी ठरला असून शमी, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ यांच्यामुळे गोलंदाजीही भरभक्कम आहे. फिरकीची भिस्त अफगाणचा स्टार रशिद खानवर असून त्याला आर. साई किशोरकडून समयोचित साथ लाभत आली आहे.









