वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रिझर्व्ह बँकेने लवकरच पेमेन्ट्स इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड(पीआयडीएफ) उभारण्याची घोषणा केली आहे. हा फंड 250 कोटी रुपयांच्या रक्कमेसोबत असणार असून या फंडच्या आधारे केंद्र आणि पूर्वेकडील राज्यांमधील लहान शहरे आणि गावांमध्ये व्यवसाय करण्यासाठी पाँईट ऑफ सेल (पीओएस) मशीनची सुविधा देण्यात येणार असल्याचे आरबीआयने सांगितले आहे.
पीओएस मशीनच्या आधारे व्यापाऱयांना डिजिटल पद्धतीने व्यवहार करता येणार आहेत. यामुळे आता व्यापारी वर्गाला आणि ग्राहकांना कोणत्याही प्रकारची रोकड जवळ बाळगण्याची गरज भासणार नाही. मागील काही दिवसांपासून ई व्यवहाराला चालना देण्यासाठीच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.
एकूण फंड 500 कोटीचा
आरबीआयच्या माहितीनुसार या योजनेसाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यातील निम्मी रक्कम सुरुवातीलाच देत असल्याचे म्हटले आहे.









