प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागेसुद्धा स्त्रीच असतेः अश्विनी बिडीकर
प्रतिनिधी /बेळगाव
महिलांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक सबलीकरण झाले असले तरी वैचारिक सबलीकरण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी मुलींना स्वतःचे विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे, असे मत जिजामाता बँकेच्या चेअरपर्सन अश्विनी बिडीकर यांनी व्यक्त केले.
आरपीडी कॉलेजतर्फे आयोजित ‘महिला सक्षमीकरण कार्यशाळे’त प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उद्योजिका सुनीता पाटणकर, प्रा. शोभा नाईक व अध्यक्षा म्हणून प्रा. माधुरी शानभाग उपस्थित होत्या. अश्विनी बिडीकर यांनी महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. परंतु त्यांच्यावर अर्थार्जनाची सक्ती होणे चिंताजनक आहे. स्त्राr मुळातच हळवी, भावनिक व आधार शोधणारी असते. परंतु तिने स्वतःचा आधार बनणे आवश्यक आहे, असेही स्पष्ट केले. सुनीता पाटणकर यांनी वयाच्या साठीनंतर सुरू केलेल्या उद्योगाची माहिती देऊन उद्योग सुरू करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी आवश्यक असल्याचे सांगितले.
स्वागतगीतानंतर डॉ. शर्मिला संभाजी यांनी स्वागत केले. प्रा. पूजा पाटील व प्रा. लता कणबरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. शोभा नाईक यांनी प्रास्ताविक केले. रेणुका काळे, मल्लव्वा राजवाडे, नम्रता सुर्वे व राजेश्वरी कुंभार यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. श्रमदेवता पुरस्कार भारती भांदुर्गे यांना देण्यात आला. विद्यार्थिनींनी आपले मत व्यक्त केले. माधुरी शानभाग यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रा. मयूरी शेट्टी यांनी आभार मानले.









