स्त्रियांनीच करायच्या अशा खास मंगळागौरी, महालक्ष्मीपूजन किंवा हरितालिका पूजन यासाठीच्या आरत्या तर इतक्मया सुंदर आणि वैविध्यपूर्ण आहेत की त्यासाठी अजूनही एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. त्याही अर्थात बऱयाचदा रागसंगीतावरच आधारित किंवा जवळच्या चालींच्या असून अतिशय श्रुतिमधुर आहेत. शिवाय त्या निसर्गतः मधुर आवाजाच्या मालकिणी असणाऱया महिलावर्गाच्या गळय़ातून उमटतात अधिकच गोड. घरातला सगळा पुरुषवर्ग कितीही लांब असल्याचे भासवत असला तरी आरती मनापासून ऐकतो. या आरत्यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे या आरत्या कोणत्याही प्रकारची वाद्ये, अगदी साधी छोटी झांजही साथीला न घेताच म्हटल्या जातात. अशा कितीतरी आरत्या कितीतरी वेळा म्हटलेल्या मला आठवतात. आम्हा गावकऱयांसाठी अभिमानास्पद गोष्ट म्हणजे आमच्या गावात काकी दीक्षित म्हणून एक आजी रहायच्या. त्या उत्तम कवयित्री होत्या. त्यांनी रचलेल्या आरत्या आम्ही आजही आवर्जून म्हणतो. या आरत्या बऱयाचदा काफी थाटातल्या रागांनाच आंदण देऊन टाकलेल्या आढळतात. त्यातल्या त्यात वेगळी आणि खमाजचा रंग असलेली
चला सख्यांनो करविर क्षेत्री जगदंबा पाहू
हळदीकुंकू हे ताटी भरोनी चरणांवर वाहू
ही आरती अत्यंत मधुर आहे. कितीही वेळा गुणगुणली तरी समाधान होऊ शकत नाही इतकी ही श्रवणीय आरती आहे. त्याचप्रमाणे या आरत्यांमध्येही भैरवीतल्या एक-दोन आरत्या आढळतात.
चल चल सखे करू पूजना
हस्तासी जोडूनी गौरीसी वंदूनी
सखे करू पूजना
ही आरती म्हणजे भैरवीची अप्रतिम छाया/छटा म्हणावी लागेल. गंमत एवढीच असते, की संगीतसभेच्या नियमांशी काहीही संबंध न ठेवता ही आरती अधेमधे कधीही म्हटली जाते. त्यामुळे त्यानंतरच्या आरत्यांना मात्र तितकीशी मजा येत नाही असे उगाचच वाटते.
चित्रपट संगीतात किंवा अल्बममधील आरत्या हा एक स्वतंत्र विषय ठरावा. कित्येक आरत्या चित्रपटाच्या टायटलपेक्षाही भाव खाऊन गेलेल्या आढळतात. एकदम जुनी आठवण काढायची झाल्यास ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातली खास पं. रामभाऊ मराठे स्पेशल असलेली आणि गमकयुक्त सुरुवात असलेली
जय जय श्री बजरंग
कपिवर श्री हनुमंता
नामस्मरणे गाता
होसी तू त्राता।़।़।़
ही आरती आठवा. तशीही ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाने सगळय़ाच बाबतीत खळबळ उडवून दिली होती! पण ही आरती म्हणजे सुपरस्पेशल आहे. कारण ही आरती जेव्हा संगीतकाराच्या हातून ‘घडली’ तेव्हा फिल्मसृष्टीतल्या, त्या काळातील सर्व आघाडीच्या गायकमंडळींना (त्यापैकीच काहींनी पंडितजींचे नाव सुचवले होते असेही म्हणतात) घेऊन प्रयोग करूनही तो इफेक्ट साधेना, जो त्यांना अपेक्षित होता. अखेरीस सर्वांर्थाने मैफिलीचे गायक आणि गायकनट असणाऱया रामभाऊंना पाचारण करण्यात आले आणि त्यांनी ते सार्थ ठरवले. इतके की ती आरती म्हणजे इतिहासच ठरली आहे. विशेषतः त्राता।़।़ वरची ती तान अशी सणसणीत भिंगरीसारखी फेकली आहे पंडितजींनी, की ‘बुद्धमिताम् वरि÷म्’ असलेल्या त्या संगीतज्ञ मारुतरायांनी जोडलेले हात पं. रामभाऊंच्याच दिशेने असावेत असे वाटते. (त्यात परत ते ‘राम’). गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली करवीर निवासिनीची ‘जय अंबे जगदंबे सकलांची माता’ ही ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील आरती असो किंवा आता अजय-अतुल यांनी संगीत दिलेली ‘दुर्गे दुर्घट भारी’ या आरतीची नवीन चाल असो, मन भारून टाकतात. आपला समाज हा व्यक्तिपूजक असला तरी आरती हा विषय हा ‘देव’ या संकल्पनेलाच वाहिलेला असला तरीही शिवरायांची आरती हा एक असाच विषय आहे. मूळ स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची ही रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात आहे. शमिका भिडे या गायिकेने ही सादर केलेलीही मी ऐकली होती, जी श्रवणीय आहे. सुप्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनीही अनेकदा ही गायिली आहे.
जय देव जय देव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्या ताराया
असे भारदस्त शब्द, आणि पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांची तितकीच भारदस्त चाल, असे हे जबरदस्त कॉम्बिनेशन! रेडिओवर असंख्य वेळा कानी पडणारी शाहीर दादा कोंडके यांनी लिहिलेली, राम लक्ष्मण यांची चाल आणि महेंद्रकुमार यांच्या आवाजातील ‘अंजनीच्या सुता’ ही आरती तर अजरामर झाली आहे. आणि सगळय़ात भाव खाऊन जाते ती मात्र आमच्या स्वरसम्राज्ञी लताबाई मंगेशकर आणि मंडळी यांनी गायिलेली संत रामदासस्वामी रचित सुखकर्ता दु:खहर्ताच! हे संगीत अर्थातच ह्रदयनाथ मंगेशकरांचे. त्यांनी ‘घालिन लोटांगण’ ची चालही फार सुरेख दिली आहे. या आरतीत शेवटी असलेली मंत्रपुष्पांजली दिवंगत गीतकार, संगीतकार यशवंत देव यांच्या स्वच्छ स्पष्ट आवाजात आहे. जेव्हा आपल्याकडे कॅसेटशिवाय काही पर्याय उपलब्ध नव्हते तेव्हापासूनच फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही या आरत्या गाजल्या
होत्या.
मनावर अधिराज्य गाजवणारी ही आरती गायली जाते ती देवांसाठी. मागच्या लेखात आपण उल्लेख केल्याप्रमाणे जिच्यात आर्तता असते ती आरती. थोडा वेगळा विचार केला तर जाणवते की देवांप्रति केले जाणारे उपचार खरेतर आपल्यासाठीच एक ‘थेरपी’ म्हणून योजले गेले असावेत. गंध, धूप, दीप, मंत्र जसे करणाऱयांच्या देहावरच सकारात्मक प्रभाव टाकत असतात त्याचप्रमाणे आरती, त्यासाठी आवश्यक असणारे संगीत, वाद्ये हे सर्व काही आरती करणाऱया माणसाच्याच देहावर त्याहीपेक्षा मनावर सुपरिणाम करतात. त्यामुळे आरती ही एक पूजा उपचार म्हणून केली जात असली तरी यातून सर्वसामान्यांना अभिजात संगीताची गोडी नकळत लावणाऱया तिच्या सर्व कवी-गीतकार, गायक-गायिका आणि संगीतकारांबद्दल,
‘गाऊ त्यांना आरती’
अपर्णा परांजपे-प्रभु








