वार्ताहर /कुद्रेमनी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र राज्य सीमाहद्दीजवळील बेळगाव-चंदगड महामार्गावरील बाची गावच्या चेकपोस्टवर कर्नाटक पोलिसांकडून आरटीपीसीआर अहवालाची तपासणी कडक केली असून परराज्यांतून कर्नाटकात येणाऱयांना आरटीपीसीआर अहवाल सक्तीचा झाला आहे.
कोरोना संसर्गजन्य रोग फैलावाच्या धास्तीमुळे कर्नाटक राज्य शासनाच्या आदेशानुसार परराज्यांतून कर्नाटकात येणाऱयांच्या अहवाल तपासणीची अंमलबजावणी काटेकोरपणे पुन्हा सुरू झाली आहे. केरळ, गोवा, महाराष्ट्र आदी राज्यांतून अनेकजण कर्नाटकात ये-जा करतात. चंदगडमार्गे बेळगावला येणाऱयांच्या वाहनांची प्रचंड वर्दळ या मार्गावरून होत असते.
रविवारी सकाळपासून बेळगावचे एसीपी गणपती गुडाजी यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस पथक चेकपोस्टवर तैनात होते. चंदगडमार्गे येणाऱया वाहनांची अडवणूक करून वाहनातील प्रत्येक माणसाच्या आरटीपीसीआर अहवालाची कसून तपासणी केली. कोविड बाबतीत दोन डोस घेतलेले अहवाल ज्यांच्याजवळ होते, त्यांना बेळगावकडे जाण्याची मुभा देण्यात आली. चेकपोस्टच्या ठिकाणी डॉक्टरांचे पथक तैनात असून येथे स्वॅब तपासणीची सुविधा उपलब्ध केली आहे. आरटीपीसीआर अहवाल नसलेल्या अनेकांची स्वॅब तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहे. तपासणीमुळे रहदारी करणाऱया वाहनांची रस्त्यांवर गर्दी दिसून येत होती. सध्या महाराष्ट्रातून चंदगडमार्गे बेळगावकडे धावणाऱया सर्व बससेवा बंद असल्यामुळे प्रवासीवर्गाची गैरसोय झाल्याची चर्चा नागरिकांतून व्यक्त होत आहे.









