एजंटांकरवी होतेय सुकर नोंदणी : नागरिकांतून संताप : आरटीओने लक्ष देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
राज्य वाहतूक विभागाने वाहन परवाना तसेच नव्या वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात सुरू केली. मात्र ती मिळण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे कित्येक महिने अर्ज दाखल करून झाले तरी संबंधितांना याबाबत काहीच माहिती देण्यात येत नसल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केल्यास सर्व्हरडाऊनची समस्या भेडसावत आहे. मात्र एजंटांकरवी अर्ज केल्यास तातडीने नेंदणी होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा अशा प्रकाराकडे आरटीओने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वाहन परवाण्यासाठी ऑनलाईनद्वारे नागरिकांना आवश्यक अर्ज घरबसल्या भरून सेवांचा लाभ घेता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. काही ठराविक जिल्हय़ांबरोबरच बेळगाव जिल्हय़ासाठीही ही योजना सुरू करण्यात आली. मात्र ऑनलाईन अर्ज भरूनही त्यांना त्वरित संदेश पाठविण्यात ही प्रक्रिया कुचकामी ठरत आहे. याचबरोबर अर्ज स्वीकारण्यासाठी अनेक समस्या निर्माण होत आहेत. परिणामी आपल्या मोबाईलवरून अथवा संगणकावरून नागरिकांनी अर्ज केल्यास सर्व्हरडाऊन अथवा चुकीची माहिती असे दाखवून तो अर्ज रद्दबातल ठरविण्यात येत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव आरटीओ कार्यालय कार्यक्षेत्रातही अशीच समस्या निर्माण होत असल्याचे प्रकार घडत आहेत. आरटीओ परिसरात असणाऱया एजंटांच्या दुकान अथवा त्यांनी सुरू केलेल्या संगणक केंद्रांवरून अर्ज केल्यास तो तातडीने स्वीकारत असल्याचे प्रकार घडत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी परिवहन सेवा आणि वाहन असे दोन ऑनलाईन सर्व्हर सुरू केले आहेत. मात्र यामध्ये मोठा गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऑनलाईन वाहतूक परवाण्याचा फज्जा उडत असल्याचेच दिसून येत आहे.
वाहतूक विभागाने सर्व आरटीओ कार्यालयांचा कारभार संगणकीकृत करण्यावर भर दिला आहे. याद्वारे सर्व आरटीओ कार्यालये एकमेकांशी जोडली गेली आहेत. यामुळे यापुढे ऑनलाईन स्वरुपात शिकावू व पक्का वाहन परवाना तसेच नूतन वाहनांची नोंदणी करून घेतली जात आहेत. मात्र या प्रक्रियेला विलंब होत असल्याने एजंटांचा सुळसुळाट वाढत आहे. खात्याच्या www.rto.kar.nic.in या वेबसाईटवर जाऊन संबंधित अर्ज भरण्यासाठीचे आवाहन करण्यात आले होते. मात्र सर्व्हरडाऊनचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
या वेबसाईटवर अर्जही भरण्यात आले आहेत. मात्र अर्ज भरणीनंतर अनेकांना वाहनपरवाना काढण्यासाठी कोणताच संदेश किंवा लेखी कागदपत्रे पाठविण्यात आली नसल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे वाहन परवाना काढायचा कधी? असा सवाल अनेकांतून उपस्थित केला जात आहे. वाहन नोंदणीसाठीही फॉर्म भरूनही अर्जदारांना कोणताच संदेश पाठविण्यात न आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ही प्रक्रिया सुलभ आणि सुरळीत करण्यासाठी आरटीओ प्रशासनाने सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
बेळगावातही उडाला बोजवारा
ही सुविधा खात्याच्या नव्या मोबाईल ऍपवरसुद्धा उपलब्ध आहे. यासाठी संबंधितांनी 1800-425-425-425 या क्रमांकावर आपल्या मोबाईलवरून मिस्डकॉल दिल्यास तातडीने उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तसे होताना दिसत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात म्हैसूर, मंगळूर, कोलार, बेळगाव, तुमकूर, बागलकोट, मंडय़ा, कारवार, हासन, बळ्ळारी, शिमोगा व बिदर आदी जिल्हय़ांसाठी ही योजना लागू करण्यात आली होती. इतर ठिकाणांबरोबरच बेळगावातही त्याचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.









