28 दिवसांत तब्बल 11 कोटी शुल्क जमा : केवळ 48 लाख 75 हजार रुपये रोकड जमा
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या ऑनलाईनचाच जमाना आहे. ऑनलाईनवरूनच कोणतेही बिल भरण्यासह इतर खरेदी होताना दिसत आहे. सरकारनेही काही कार्यालयांचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच आकारण्यास सुरुवात केली आहे. उपनोंदणी कार्यालयानंतर सर्वाधिक महसूल देणारे कार्यालय म्हणून आरटीओकडे पाहिले जाते. या आरटीओचा कारभारही आता ऑनलाईनद्वारे होत आहे. त्यामुळे रोख रकमेऐवजी ऑनलाईनद्वारे थेट सरकारच्या तिजोरीत रक्कम जमा होताना दिसत आहे. बेळगाव आरटीओ कार्यालयातून केवळ 28 दिवसांत तब्बल 11 कोटी रुपये शुल्क ऑनलाईनद्वारे जमा झाले आहे.
आरटीओ कार्यालयाचा इतिहास हा ब्रिटिशकाळापासूनचा आहे. ब्रिटिश कारभाऱयांनी वाहतुकीला नियम घालण्यासाठी आणि कर गोळा करण्यासाठी या कार्यालयाची स्थापना केली. बेळगाव येथील आरटीओ कार्यालयाचीही स्थापना सुमारे 1940 च्या दशकात झाली. तेव्हापासून सर्व कारभार किंवा देवाण-घेवाण ही रोकड आणि कागदोपत्रांवर चालायची. मात्र आता हे कार्यालय हळूहळू कात टाकत असून आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळू लागले आहे. येथील अधिकतर महसूल आता ऑनलाईन जमा होत असून मोठय़ा प्रमाणात करही भरला जात आहे.
बेळगावमधील आरटीओ कार्यालयात आतापर्यंत 56 अधिकाऱयांनी पदाचा कार्यभार सांभाळला आहे. जुनी कागदपत्रे तसेच इतर काही व्यवहार कागदपत्रांवर चालत असले तरी इतर सर्व कारभार किंवा पैशांचे अधिकतर व्यवहार हे ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे येथील एजंटगिरीला काही प्रमाणात चाप बसला आहे. वाहने जप्त किंवा दंड आकारणी हे सर्व व्यवहार आता अधिकतर ऑनलाईन करण्यात येत आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालय ऑनलाईनकडे वळले आहे.
दि. 1 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत आरटीओ कार्यालयात 11 कोटी 24 लाख 22 हजार 568 रुपयांचे व्यवहार हे ऑनलाईन झाले आहेत तर 48 लाख 75 हजार 63 रुपयांचे व्यवहार रोकड स्वरुपात झाले. डीडी स्वरुपात सुमारे 1 कोटी 28 हजार 557 रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे नागरिकही ऑनलाईनकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. या महिन्यात एकूण 12 कोटी 73 लाख 26 हजार 188 रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यामध्ये अधिकतर ऑनलाईन स्वरुपातील व्यवहार आहेत.
या कार्यालयात पहिला आरटीओ हा 1940 साली रुजू झाल्याचे नमूद असले तरी येथील कारभार ऑनलाईन पद्धतीने कालांतराने होत गेला. आज अधिकतर शुल्क किंवा महसूल हे ऑनलाईनद्वारे जमा होत आहे. त्यामुळे पारदर्शक कारभारासाठी येथील कार्यालय सज्ज होत असताना दिसत आहे. बेळगाव येथील आरटीओ कार्यालय सुमारे 80 वर्षांपूर्वींचे आहे. तेव्हापासूनचा सर्व कारभार हा कागदोपत्रावरच चालत होता. परिणामी आता येथील कार्यालयाने कात टाकत आधुनिकतेची कास धरली आहे. त्यामुळे येथील सर्वच व्यवहार ऑनलाईन झाल्यास सर्वांनाच सोयीचे ठरणार आहे.
सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न : आरटीओ-शिवानंद मगदूम

सध्या येथील कारभाराला आधुनिकतेची जोड मिळत आहे. साधरणतः महिन्याला 10 कोटींचा महसूल किंवा शुल्क हे ऑनलाईनद्वारेच जमा केले जात आहे. आता या कामाला प्रगती देऊन येथील सर्व कारभार ऑनलाईन कसा होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या महिन्याभरात 11 कोटींचा महसूल किंवा शुल्क हे ऑनलाईनद्वारे जमा करण्यात आले आहे. यापुढेही अधिकाधिक व्यवहार ऑनलाईन होतील, यासाठी प्रयत्न असणार आहेत.









