ऑनलाईन टीम / पाटणा :
कोरोना संकटा दरम्यान, बिहारमध्ये काही दिवसांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीपुर्वी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे सल्लागार संजय यादव यांना कोरोनाची लागण झाली आहे. संजय यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आरजेडी नेता तेजस्वी यादव स्वतः हुन क्वारंटाइन झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय यादव सध्या दिल्लीमध्ये आहेत. तेजस्वी यादव देखील चार दिवसांपूर्वी त्याच्या सोबत होते. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर तेजस्वी यादव वडील लालू प्रसाद यादव यांना देखील भेटले होते. त्यानंतर तेजस्वी यादव हे पाटणामध्ये आई राबडी देवी आणि भाऊ तेज प्रताप यादव सह संपूर्ण कुटुंबाच्या संपर्कात होते.
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे देखील मागील काही दिवसांपासून रांची मधील रिम्समध्ये दाखल आहेत. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या काळात लालू प्रसाद यादव यांच्या मुलाने म्हणजेच तेजस्वी यादव यांनी पक्षाची धुरा सांभाळली आहे. त्यांनी या काळात लोकांमध्ये जावून काम केले तसेच पूरग्रस्त भागांचे दौरे देखील केले. तसेच कोरोनाचे वाढते रुग्ण, अन्य राजकीय मुद्दे मांडत नितीश सरकारवर टीका देखील केली आहे.









