नाना पटोले यांच्या वक्त्यव्याचा विपर्यास केला गेला, भाजप ईडीचा सूड बुद्धीने वापर करत आहे
सातारा / प्रतिनिधी
केंद्र सरकारने 102 वी घटना दुरुस्ती केली आहे. या घटना दुरुस्तीतुन केंद्र सरकारला आता पळ काढता येणार नाही. प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी लागेल, असे सांगत केंद्रातले भाजप सरकार महाराष्ट्रात सूड बुद्धीने ईडीचा वापर करत आहे, असा आरोप राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपवर केला आहे. दरम्यान, नाना पटोले यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते साताऱ्यात दुपारी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने नुकतीच 102 व्या घटनादुरुस्ती केली आहे. त्याबाबत केंद्राकडून कृती झाली पाहिजे. नेमकी कृती काय होणार आहे यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. आता केंद्र शासनाला यामधून पळ काढता येणार असे सांगत पुढे ते म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रात ईडीचा सूड बुद्धीने वापर करत आहे. हे सर्व जनता जाणते, असा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडी राज्यात काय करते याचे सर्टिफिकेट भाजपने का द्यावे?, सर्वसामान्य जनतेला माहिती आहे, अशी ही टिप्पणी केली.
नाना पटोले यांच्या वक्तव्याचा विपर्यास
नाना पटोले यांच्या बाबत छेडले असता ते म्हणाले, अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतुन आम्ही लढलो आहोत.जिथं शक्य असेल तिथं आघाडी होणार असून महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद आणि गैरसमज नाहीत. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रा वाघ यांची पार्श्वभूमी महाराष्ट्राला माहिती आहे
भाजपच्या युवती प्रदेशअध्यक्ष चित्रा वाघ यांच्याबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले, चित्रा वाघ यांची पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यांना बोलायचा अधिकार आहे का ?, काहीतरी सनसनाटी आरोप करून चर्चेत राहण्यापलीकडे काही काम करताना त्या दिसत नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली. तसेच सातारा पोलीस दलात बदली केल्यावरून पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे पाऊल त्यांनी उचलायला नको होते. सर्व पोलिसांना एकसारखा नियम लावण्याच्या सूचना गृहराजमंत्री सतेज पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या असल्याचे सांगितले.