मराठा समाजाचा इशारा : निपाणीत क्षत्रिय मराठा परिषद : विविध विषयांचे ठराव मंजूर
प्रतिनिधी/ निपाणी
कर्नाटकात मराठा समाजाचा केवळ राजकारणासाठी वापर होत आहे. समाजाला 3-बी ऐवजी 2-ए आरक्षण देण्याचे आश्वासन अनेकांनी दिले, मात्र ते अद्याप पाळलेले नाही. आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क असून तो देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा. अन्यथा बेंगळूर येथे फ्रिडम पार्कमध्ये अथवा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी विधानसौधला घेराव घालण्याचीही तयारी असल्याचा इशारा कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनचे राज्याध्यक्ष शामसुंदर गायकवाड यांनी दिला.
निपाणीत रविवारी क्षत्रिय मराठा फेडरेशनतर्फे मराठा परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. स्वागत जयराम मिरजकर तर प्रास्ताविक सुदीपसिंह उगळे यांनी केले. यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर कडोलकर यांनी, कर्नाटकात मराठा समाजाची लोकसंख्या 60 लाखांवर असून हा समाज विखुरला आहे. अपेक्षेप्रमाणे या समाजाचा विकास झालेला नाही. ज्याप्रमाणे सरकारने मराठा विकास निगम स्थापन केले आहे, त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.
नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी समाजातर्फे घेण्यात येणाऱया निर्णयाला पाठिंबा असून मराठा समाजासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी दिल्याचे सांगितले. मराठा फेडरेशनचे राज्य सचिव जे. डी. घोरपडे यांनी निपाणी अथवा चिकोडीत 21 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त भव्य मराठा मेळावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. जि. पं. सदस्या सुमित्रा उगळे यांनी मराठा समाजाला 500 वर्षांपासून फितुरी व भाऊबंदकीची किड लागली आहे. ती नष्ट होऊन समाजाने एक होण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी मंगला काशीकर, टी. एस. मोरे, नगरसेवक श्रीमंत दादाराजे देसाई-सरकार, अनिल खाडे, आनंदराव यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. विठ्ठल वाघमोडे यांनी मराठा विकास निगमची कार्यकारणी निवडून अध्यक्षपदी शामसुंदर गायकवाड यांची निवड करण्याची मागणी केली. बैठकीत मराठा विकास निगम अध्यक्ष निवड करावी, प्रत्येक जिल्हय़ात समाजाचे मेळावे घ्यावेत, समाजाला 2-ए आरक्षणाचा लाभ सरकारने द्यावा यासह विविध मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले.
याप्रसंगी एपीएमसी अध्यक्ष अमित साळवे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, गोपाळ नाईक, बाळासाहेब पाटील, संकेश्वरचे श्रीकांत हतनुरी, उद्योजक दिलीप चव्हाण, धनाजी भाटले, ऍड. बी. आर. यादव यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, फेडरेशनचे सदस्य, समाज बांधव उपस्थित होते. प्रा. मधुकर पाटील यांनी सूत्रसंचालन केले.









