प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यभर पेटलेल्या मराठा आरक्षण हक्काच्या मागणीसाठी रत्नागिरीतील सकल मराठा समाजही रस्त्यावर उतरला. भगवा झेंडा आणि मराठा क्रांती मोर्चाचे फलक झळकावत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘अरे या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, अशा गगनभेदी घोषणा देत जोरदार निदर्शने करण्यात आली. मोर्चेकऱयांनी जिल्हाधिकाऱयांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे वातावरण काहीसे गरम बनले होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील सकल मराठा समाज देखील पुढे सरसावला आहे. शुक्रवारी मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा बांधवांनी धडक दिली. त्यापूर्वी मारूतीमंदिर येथील छ.शिवाजी महाराज पुतळय़ाला अभिवादन करून मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बहुसंख्येने मराठा आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. त्यावेळी मराठा आरक्षण देण्यास शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत आंदोलकांनी खेद व्यक्त केला. शासनाच्या नाकर्ते धोरणाबाबत जोरदार निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनावेळी कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनामार्फत चोख पोलीसफौजफाटा तैनात करण्यात आला होता. आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱयांची वेळ घेण्यात आलेली होती. पण जिल्हाधिकाऱयांना येण्यास काही अवधी गेल्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये यावरून चर्चा झाली. प्रवेशद्वारावरच जिल्हाधिकाऱयांना अडवण्याचा पवित्रा काही आंदोलकांनी घेतल्यामुळे वातावरण काहीसे गरम झाले होते. जिल्हाधिकाऱयांची गाडी प्रवेशद्वाराजवळ येताच आंदोलकांचा पवित्रा लक्षात घेत त्यांना कडे करून रोखून धरले. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांची गाडी दुसऱया प्रवेशद्वाराने मार्गस्थ करण्यात आली. मोर्चेकऱयांच्या पदाधिकाऱयांनीही कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संयम राखण्याचे आवाहन केले.
त्यानंतर आंदोलकांचे शिष्टमंडळांने जिल्हाधिकाऱयांना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भेट दिली. त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व मराठा क्रांती मोर्चाचे येथील पदाधिकारी दिनेश सावंत, सुधाकर सावंत, ऍड. अजय भोसले, माजी आमदार बाळ माने, संतोष तावडे, केशवराव इंदुलकर, कौस्तुभ सावंत, नंदू चव्हाण आदीनी केले. शांतता व संयम राखून प्रशासनाला सहकार्य करतोय याचे प्रशासनाने देखील भान राखावे अशा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.









