मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट
प्रतिनिधी/ सातारा
मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजेत यासाठी खासदार उदयनराजेंनी भेटीगाठीचे सत्र सुरूच ठेवले आहे. बुधवारी उदयनराजेंनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा भेटून मराठा आरक्षणासाठी लक्ष घालण्याबाबत विनंती केली आहे. या भेटीबाबत मात्र, राजेंनी मीडीयाला काहीच माहिती दिली नाही. तर दुसऱया बाजूला त्यांचेच बंधू आमदार शिवेंद्रराजे हेही आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा यांची दुसऱयांदा भेट घेतली आहे. त्यांनीही मतदार संघातील विकासकामांच्या अनुषंगाने भेट घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र आगामी जिल्हा बँकेच्या अनुषंगाने त्यांच्या भेटी होत असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे.
खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीला न्यायचाच या इराद्याने कामाला लागलेले आहेत. त्यांनी मागच्याच चार दिवसांपूर्वी दिल्लीत खासदार शरद पवारांची भेट घेत वडिलकीच्या नात्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती केली होती. राजकारणाच्या पलिकडे जावून खासदार उदयनराजे यांनी दिल्लीत अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडे साताऱयासाठी नवीन काही आणता येईल याचा प्रयत्न केला. दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट त्यांच्या निवासस्थानी जावून घेतली. तब्बल अर्धा तास दोघांच्यात चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी आपला ताफा शरद पवार यांच्याकडे वळवला. शरद पवार यांची दुसऱयांदा भेट घेतल्याची चर्चा रंगत होती. या भेटी त्यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने पक्षीय मतभेद बाजुला सारुन भेट घेतल्या समजते.
शिवेंद्रराजेंच्या वारंवारच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात
खासदार उदयनराजे हे मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वार्ता वाऱयासारखी साताऱयात पसरली. त्याचबरोबर आमदार शिवेंद्रराजेही उपमुख्यमंत्री अजितदादा यांना भेटले. अजितदादांची आणि त्यांची दुसरी भेट होती. अजितदादांची पहिली भेट बारामती येथे त्यांनी घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी मुंबईत जावून निवासस्थानी भेट घेतली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर मुद्दे असल्याने त्यांच्या भेटीला मोठे महत्व आहे. आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडे आमदार शशिकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार शिवेंद्रराजे हे राष्ट्रवादीत आले तर त्यांच्याकडे सातारा पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी असेल असे सूचक वकत्व्य आमदार शशिकांत शिंदे यांनी केले होते. त्याच अनुषंगाने तर भेट घेतली नाही ना अशी चर्चा सुरु होती. मात्र, आमदार शिवेंद्रराजेंनी आजची भेट मतदार संघातील विकासकामांच्या अनुषंगाने असल्याचे सांगितले.
जिल्हा बँकेची रणनिती काय?
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी एकवटली आहे. त्यांना बाजूला ठेवण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. असे असताना आमदार शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्यासोबत घेतलेली भेट ही जिल्हा बँकेच्या अनुषंगाने तर नाही ना अशी चर्चा सुरु होती.








