कणकवलीतील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम
लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्सचा काही भाग बाधित
रस्त्याची हद्द निश्चित करण्यासाठी करण्यात आली मोजणी
प्रतिनिधी / कणकवली:
शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादनाची ‘आरओडब्ल्यू’ लाईन निश्चित न करताच, ठेकेदार कंपनीने गटाराचे बांधकाम सुरू केल्याचे उघड झाले आहे. चौपदरीकरण-सर्व्हिस रोडच्या गटाराचे काम करताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आक्षेप घेतल्यावर सोमवारी चौपदरीकरणासाठी भूसंपादन केलेल्या जागेची मोजणी करण्यात आली. त्यावेळी काही जुनी, तर काही नवीन बांधकामे ‘आरओडब्ल्यू’ लाईनमध्ये येत असल्याचे उघड झाले. तर लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्सचा काही भाग ‘आरओडब्ल्यू’ लाईनमध्ये बाधित असल्याचेही यावेळी लक्षात आल्याने अनागोंदी कारभाराने सर्व्हिस रस्त्याचे काम केले गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर रस्त्याची हद्द निश्चित करण्यासाठी सोमवारी नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱयांच्या उपस्थितीत मोजणी करून घेण्यात आली.
महामार्गावरचे काम पुढील शेकडो वर्षे राहणार आहे. हे करताना भविष्यात इतर नागरी सुविधांना बाधा येऊ नये म्हणूनच आम्ही शहरातील महामार्गाची ‘आरओडब्ल्यू’ लाईन निश्चित करून घेत आहोत. पण हे करताना नागरिकांना त्रास होईल, असा निर्णय घेणार नाही, अशी ग्वाही ‘आरओडब्ल्यू’ निश्चितीनंतर पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष नलावडे यांनी दिली. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, रवींद्र गायकवाड, महेश सावंत, अण्णा कोदे, नंदू वाळके, बाळा सावंत, तर लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्समधील व्यावसायिक अनिल मांजरेकर, संजय सावंत, एस. टी. सावंत, तांबे, डामरी आदी उपस्थित होते.
सोमवारी ठेकेदार कंपनीकडून लाईनची मोजणी करण्यात आली. या मोजणी दरम्यान बाजारपेठ रस्ता ते कला फोटो स्टुडिओपर्यंत सुमारे एक ते तीन मीटर जागा बाहेर ठेवून आतमध्येच गटाराचे बांधकाम करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यामुळे संपादित केलेली जागा गटाराच्या बाहेर राहत असल्याने या जागेत येत असलेल्या बांधकाम व अतिक्रमणाची पाहणी नगराध्यक्ष नलावडे, उपनगराध्यक्ष हर्णे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी केली. नगरपंचायतीच्या नळयोजनेची पाईपलाईन घालण्यासाठी किमान दीड मीटर जागा आवश्यक असून ही जागा सोडण्याबाबत ठेकेदार कंपनीला अनेकदा सूचना दिल्या. मात्र, त्याची कार्यवाही झालेली नाही, असेही नलावडे यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षांनी ठेकेदार कंपनीकडून मोजणी करून ‘आरओडब्ल्यू’ लाईन हद्द दाखविलेल्या पॉईंटची पाहणी केली. त्यानंतर नगरपंचायतीत लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्समधील व्यावसायिक व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांसोबत बैठक झाली.
यावेळी नलावडे यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कणकवलीतील जनतेने आम्हाला येथे बसविले आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न हा कणकवली शहराची जनता म्हणून आम्ही सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ. जनतेसाठी प्रसंगी नियम वाकवूनही मदत करू, अशी ग्वाही दिली. त्यावर हर्णे यांनी तुम्हाला सहकार्याची भूमिका घेत असताना मात्र पुढील शंभर वर्षांचा विचार करून नगरपंचायतीला पाईपलाईन व विद्युत वाहिनी, गॅस लाईनसाठी आवश्यक जागा सोडण्याबाबत कोणतीही तडजोड चालणार नसल्याचे स्पष्ट केले. या मोजणीत लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्समधील कॉर्नरवरील जो एक कॉलम बाधित होत आहे, तो वाचविण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी दिली. याबाबत संबंधित अधिकाऱयांशी चर्चा करण्यात येईल व लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्समधील तळमजल्याच्या गाळय़ासमोर काँक्रिटची संरक्षक भिंत बांधून घेण्यात येईल. त्यावरून गटार व त्याला लागून दीड मीटर पाईपलाईनसाठी जागा ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही नलावडे यांनी सांगितले. त्यावर या व्यावसायिकांनी आमचे नगरपंचायतीला पूर्ण सहकार्य असेल, अशी आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले.









