जयपूर : राजस्थान रॉयल्स संघ संयुक्त अरब अमिरातमध्ये जाताना आपल्यासोबत 15 खेळाडूंना नेट बॉलर्स म्हणून नेणार असून त्यात राजस्थानमधील तीन खेळाडूंचा समावेश आहे.
वेगवान गोलंदाज अराफत खान, डावखुरा स्पिनर चंद्रपाल सिंग यांना राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव आहे तर लेगस्पिनर अंकित सोनीला आयपीएलमध्ये सात सामने खेळण्याचा अनुभव आहे. 2017 मध्ये तो गुजरात लायन्स संघातून खेळला होता.
अराफत सध्या मुंबईत असून त्याने याआधीही नेटबॉलर म्हणून काम पाहिले आहे. ‘गेल्या वर्षीही मी या संघाचा नेटबॉलर होतो. हा एक पूर्णपणे वेगळा अनुभव असून स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोस बटलर यासारख्या बडय़ा खेळाडूंना गोलंदाजी करण्याची संधी त्यातून मिळते. हे खेळाडूंदेखील आपल्याला मार्गदर्शन करीत असल्याने नवोदित क्रिकेटपटूंसाठी ते खूप मोलाचे ठरणारे असते,’ असे 23 वर्षीय अराफत म्हणाला.
‘गेल्या वेळी नेटमधील सरावावेळी मी अनेकदा यॉर्कर्स टाकले असून स्मिथने त्याबद्दल माझे कौतुकही केले होते. अतिशय उत्तम गोलंदाजी केल्याचे त्याने मला म्हटले होते,’ असे अराफतने सांगितले.









