क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आय-लीग फुटबॉल स्पर्धेत काल खेळविण्यात आलेल्या लढतींत रियल काश्मीर, गोकुळम केरळ आणि मोहम्मेडन स्पोर्टिंग यांनी विजयाची नोंद केली. कोलकातात विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात रियल काश्मीर संघाने ऐजॉल एफसीचा 3-1 गोलानी पराभव केला.
रियल काश्मीरसाठी मॅसोन रॉबर्टसनने दोन तर एक गोल लुकमन आदेफेमीने केला. पराभूत ऐजॉल एफसीचा एकमेव गोल लालरेम सांगा फनायने केला. विजयाच्या तीन गुणानी रियल काश्मीरचा संघ 9 सामन्यांतील 17 गुणांनी पहिल्या स्थानावर आहेत. ऐजॉल एफसीचे 9 सामन्यांतून 12 गुण आहेत. कल्याणी स्टेडियमवर झालेल्या दुसऱया सामन्यात गोकुळम केरळने सुदेवा दिल्ली एफसीचा फिलीप एडजाहने केलेल्या एकमेव गोलमुळे पराभव केला. गोकुळमचे आता 9 सामन्यांतून 16 तर सुदेवा दिल्ली एफसीचे 9 सामन्यांतून 9 गुण झाले आहेत.
प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या सामन्यात मोहम्मेडन स्पोर्टिंगने इंज्युरी वेळेत केलेल्या गोलमुळे चेन्नई सिटीचा 2-1 गोलानी पराभव केला. स्पोर्टिंगसाठी सुजित साधू आणि संजय रावतने तर पराभूत चेन्नईन सिटीचा एकमेव गोल रणजित पांड्रेने केला. आता मोहम्मेडनचे 9 सामन्यांतून 13 तर चेन्नईनचे 9 सामन्यांतून 9 गुण झाले.









