प्रतिनिधी / इस्लामपूर
आय लव्ह यु बायको असा व्हॉटसॲप स्टेटस ठेवत एका महाविद्यालयीन तरुणीचा महादेववाडी येथील एका प्रेमवीर तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. वैभव तानाजी औताडे रा.महादेववाडी मुळ रा.सोहली, ता.कडेगाव असे संशयीत आरोपीचे नाव आहे. इस्लामपुरातील एका महाविद्यालयात ही तरुणी शिक्षण घेते.
औताडे याने काही दिवसांपुर्वी अक्षय काटेयाच्या मार्फत तरुणीला मला फोन कर मला तुझ्याशी बोलायचे आहे. असे निरोप दिला होता. परंतू त्या तरुणीने त्याला फोन केला नाही, त्यानंतर औताडे याने फोन करून माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का असे विचारले होते. त्यावेळी या तरुणीने त्याला नकार दिला होता. तरी देखील ही तरुणी कॉलेजवर आल्यानंतर औताडे याने मोटारसायकलवरून पाठलाग सुरु ठेवला. या प्रकाराची मुलीने आई-वडील व भावास माहिती दिली. घरातील लोकांनी औताडे यास समज दिली होती.
तरीदेखील औताडे याने या तरुणीस फोन केला, फोन उचलला नाही व त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. म्हणून या तरूणीचा फोटो व्हॉटसॲप ठेवून आय मीस यू व आय लव्ह यू बायको, असा मजकूर ठेवून या तरुणीस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात औताडे याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.









