ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी योगी सरकारला धक्का बसला आहे. अयोध्येत, गोसाईगंज विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदाराचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याचे कारण खोटे मार्कशीट आहे. आमदाराने चक्क खोटी मार्कशीट दाखवून पुढच्या वर्गात प्रवेश केल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे आमदारकी रद्द झाली आहे.
दरम्यान, साकेत महाविद्यालयाचे प्राचार्य यदुवंश राम त्रिपाठी यांनी 1992 साली इंद्र प्रताप तिवारी उर्फ खब्बू, कृपा निधान तिवारी आणि फूलचंद यादव यांच्या विरोधात बनावट मार्कशीटच्या आधारे पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याबद्दल 18 फेब्रुवारी 9219 रोजी रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासानंतर, तपासकर्त्याने सर्व लोकांविरुद्ध कलम 419, 420 आणि आयपीसीच्या इतर कलमांखाली आरोपपत्र न्यायालयात सादर केले. कनिष्ठ न्यायालयाने हे प्रकरण 2018 मध्ये सुनावणीसाठी सत्राकडे पाठवले. विधानसभेचे प्रधान सचिव प्रदीप कुमार दुबे यांनी खब्बू तिवारी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे.









