अन्य काही आजारांच्या उपचारातही मिळणार लाभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत’ योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. हेल्थ बेनेफिट पॅकेजमध्ये अनेक हेल्थ पॅकेजचे दर 20 टक्क्यांपासून 400 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. देशभरात आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना (एबी पीएमजेएवाय) लागू करणाऱया नॅशनल हेल्थ अथॉरिटीने ही माहिती दिली आहे.
आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत देशातील 10 कोटी गरीब कुटुंबांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला जातोय. योजनेत सामील 400 हेल्थ पॅकेजचे रेट बदलण्यात आले आहेत. तसेच ब्लॅक फंगस यासारख्या आजारांनाही नव्या मेडिकल मॅनेजमेंट पॅकेजमध्ये जोडण्यात आले आहे.
हेल्थ बेनिफिट पॅकेजचे सुधारित स्वरुप सादर करण्यात आले आहे. यामुळे आयुष्मान भारत योजनेशी संबंधित रुग्णालयांना एबी-पीएमजेएवायच्या लाभार्थ्यांना चांगला उपचार उपलब्ध करण्यास मदत मिळणार आहे. ओंकोलॉजीसाठी सुधारित पॅकेजच्या मदतीने देशात कर्करोगाच्या रुग्णांना मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. ब्लॅक फंगस यासारख्या नव्या आजारांसाठी पॅकेज जोडण्यात आल्याने देशाच्या लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. हेल्थ बेनिफिट पॅकेजमध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे खासगी रुग्णालयांना गरीबांवर उपचार करण्यास सुविधा हाइxल आणि यामुळे लाभार्थ्यांना स्वतःच्या खिशातून कुठलीच रक्कम खर्च करावी लागणार नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.
योजना होणार प्रभावी
आयुष्मान भारत योजनेशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून ही योजना अधिक प्रभावी करण्यासाठी काम करत आहोत. हेल्थ बेनिफिट पॅकेजच्या दरांमध्ये सुधारणा करणे हे याच दिशेने उचलण्यात आलेले पाऊल आहे. योजनेच्या प्रारंभापासूनच यात सातत्याने अधिकाधिक आजारांना व्यापले जातेय आणि नवी पॅकेज जोडण्यात येत आहेत. याचबरोबर आजारांवरील उपचारात खर्च होणाऱया रकमेशी संबंधित पॅकेजमध्ये वारंवार सुधारणा केली जात असल्याचे नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे सीईओ आर.एस. शर्मा यांनी सांगितले आहे.









