पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रम, देशव्यापी प्रयोग
वाराणसी / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे ‘आयुषमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत देशभरात ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये आरोग्य केंद्रे, उपचार केंद्रे, क्रिटिकल केअर सेंटर्स (गंभीर आजार उपचार केंद्रे) व इतर आरोग्य विषयक सुविधांचे निर्माण कार्य करण्यात येणार आहे.
या अभियानाचे नाव प्रधानमंत्री आयुषमान भारत आरोग्य सुविधा योजना असे ठेवण्यात आले आहे. ही भारतातील अतिविशाल योजनांपैकी एक आहे. शहरी आणि ग्रामीण भागांमधील आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करणे हे या योजनेचे एक महत्वाचे उद्दिष्टय़ आहे. ज्या ठिकाणी आरोग्य सेवा कमी पडत असतील तेथे या योजनेच्या माध्यमातून कमतरता दूर केली जाणार आहे. 10 हाय-फोकस राज्यांमध्ये 17,788 ग्रामीण आरोग्य केंद्र आणि गंभीर आजार उपचार केंद्रे स्थापन केली जाणार असून अन्य आरोग्य केंद्रांना आधार दिला जाणार आहे. शहरी भागांमध्येही 11,024 केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.
अनेक संस्था उभ्या करणार
विषाणूविज्ञानाच्या चार राष्ट्रीय संस्था, विभागीय संशोधन केंद्रे, एक मोठी आरोग्य संस्था, 9 जीवसुरक्षा प्रयोगशाळा, 5 रोगनियंत्रण राष्ट्रीय केंद्रे, इत्यादी आस्थापने या अभियानाच्या अंतर्गत स्थापन करण्यात येणार आहेत.
वाराणसीसाठी विविध प्रकल्प
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी 5,200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचीही पायाभरणी केली. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर योजनांचा या विकास प्रकल्पांमध्ये समावेश आहे. वाराणसीतही अत्याधुनिक आरोग्य सेवा प्रदान करण्यात येणार आहे.









