संजीव खाडे / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत येत्या 15 नोव्हेंबरला संपणार आहे. पण कोरोनामुळे पंचवार्षिक निवडणूक लांबणीवर गेल्याने महापालिकेची सूत्रे प्रशासकाच्या हाती जाणार आहे. विद्यमान नूतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडेच महापालिकेच्या प्रशासकपदाची जबाबदारी देण्याचे राज्य शासनाच्या स्तरावर निश्चित झाले असल्याची माहिती नगरविकास विभागातील सूत्रांनी दिली. डॉ. बलकवडे यांच्या रूपाने कोल्हापूर महापालिकेवर सहाव्यांदा प्रशासकाची नियुक्ती होणार आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक लांबणीवर टाकावी लागली आहे. शासनाच्या नियमानुसार महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपण्याआधी किमान पाच ते सहा महिने निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी लागते. कोल्हापूर महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तयारी प्रक्रिया जून 2020 मध्ये सुरू होणे आवश्यक होते, पण कोरोनामुळे ही प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे निवडणूक लांबणीवर जाणार हे स्पष्ट झाले होते. विद्यमान सभागृहाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती जाणार आहे. प्रशासक म्हणून कुणाची नियुक्ती होणार? याकडे साऱयाच्या नजरा आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान आयुक्त डॉ. बलकवडे यांच्याकडेच प्रशासकाची जबाबदारी देण्याचे नगरविकास विभागाने निश्चित केले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे पत्र प्राप्त होताच प्रशासनक नियुक्तीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एआयएस अधिकारीच प्रशासन
एखाद्या महापालिकेवर प्रशासक नियुक्त करत असताना तो आयएएस दर्जाचाच असला पाहिजे, असा शासनाचा अलिखित नियम आहे. आयएएस अधिकारी महापालिकेचा कारभार सुलभतेने करू शकतो. निवडणुकीनंतर नवीन सभागृहातील नगरसेवक निवडून येईपर्यंत महापालिकेच्या कारभाराची जबाबदारी सांभाळण्यासाठी नियुक्त केलेल्या आएएस अधिकाऱयाकडे राहणार आहे.
विकासकामे सुरूच राहणार
महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्यानंतर विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही. प्रशासक नवीन विकासकामांची अंमलबजावणी करू शकतात. केवळ निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता काळात विकासकामांवर मर्यादा येतात. प्रशासकाच्या कालावधीत विकासकामे सुरळीतपणे सुरू राहतील, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांनी दिली.
आजवर झालेले प्रशासक
नाव कालावधी
1) व्दारकानाथ कपूर 15-12-1972 ते 15-4-1975
2) एन. पी. देवस्थळे 16-4-1975 ते 8-5-1977
3) व्ही. एन. मखिजा 7-7-1977 ते 10-7-1978
4) डी. टी. जोसेफ 11-7-1978 ते 16-8-1978
5) शिवलिंग भोसले 11-4-1984 ते 19-3-1985
आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे
2010च्या बॅचमधील आयएएस, नागालँड कॅडरमधील, 2015 पर्यंत नागालँडमध्ये पोस्टिंग, त्यानंतर महाराष्ट्रात नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, गोंदियाच्या जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी. या काळात पोट निवडणूकही यशस्वीपणे हाताळली. आता कोल्हापूरच्या आयुक्त. डॉ. बलकवडे यांचे पती शैलेश बलवकडे हे कोल्हापूर जिल्हÎाचे पोलीस अधीक्षक आहेत.
व्दारकानाथ कपूर कोल्हापूरांच्या आजही हृदयात
1972 ते 1975 या काळात कोल्हापूर महापालिकेचे प्रशासक असताना व्दारकानाथ कपूर यांनी शहर विकासाच्या केलेल्या कामाची आठवण आजही कोल्हापूरकर काढतात. कपूर यांनी त्यावेळी भविष्यातील कोल्हापूर शहर डोळÎासमोर ठेवून शहरात विविध योजना, उपक्रम राबविले. रस्तारूंदीकरणाबरोबरच शाळा, उद्यानांचे विकास केला. नागरिकांशी थेट संपर्क आणि संवाद ठेवून प्रशासक म्हणून जबाबदारी पार पाडलेले कपूरसाहेब आजही त्यावेळच्या पिढीच्या हृदयात आहेत. त्यांच्या नावाने शहरात एक वसाहतही आहे.
आयुक्त चौगले व आयुक्त भोसले आणि नगरसेवक संघर्ष
90 च्या दशकात कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्या सभागृहाची मुदत संपल्यानंतर तत्कालिन आयुक्त एस. डी. चौगले यांनी निवडणूक घेण्यास टाळाटाळ केली. त्यातून नगरसेवक आणि चौगले यांच्यात संघर्ष झाला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तेथे नगरसेवकांच्या बाजूने निर्णय झाला. तो पर्यंत शिवलिंग भोसले आयुक्त झाले. त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. पण सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळत नगरसेवकांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर 1985 मध्ये निवडणूक झाली. दुसऱया सभागृहात धोंडीराम रेडेकर पहिले तर ऍड. महादेवराव आडगुळे दुसरे महापौर झाले.









