महानगरपालिकेचे कामकाज कोलमडल्याचा आरोप : नागरिकांचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका कार्यालयातील प्रशासकीय कामकाज कोलमडले असून, नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सुरळीत पाणीपुरवठा नाही, स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. कार्यालयीन कामकाज व्यवस्थित होत नाही. त्यामुळे महापालिका कार्यालयाचे कामकाज सुरळीत आणि पारदर्शी चालण्यासाठी आयएएस श्रेणीच्या अधिकाऱयाची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करावी, अशा मागणीचे निवेदन प्रादेशिक आयुक्त अमलान बिस्वास यांना देण्यात आले.
शहरवासियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका यंत्रणा तत्पर राहणे गरजेचे आहे. पण मनपाचा कारभार सुरळीत नसल्याने नागरिकांच्यावतीने महापालिका आयुक्तपदी आयएएस अधिकाऱयाची नियुक्ती करण्याचे निवेदन देण्यात आले. कार्यालयातील कामकाज विस्कळीत झाल्याने इमारत बांधकाम परवाना वेळेत मिळत नाही, जुन्या जन्म व मृत्यू दाखल्यांची नोंद संगणकावर करण्यात आली नसल्याने वेळेत दाखले मिळत नाहीत. काही पदांवर अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने कामकाज खोळंबले आहे.
सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये डिझेल शवदाहिनी बसविण्यात आली आहे. ही शवदाहिनी बसविण्यासाठी 2019 मध्ये 45 लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. 2019 ते 2021 या दोन वर्षात केवळ एकच अंत्यविधी करण्यात आला आहे. हा प्रकल्प व्यवस्थितपणे राबविण्यात आला नसल्याने पूर्णपणे निकामी ठरला आहे. कोरोना काळात अनेक नागरिक बळी पडले. त्या दरम्यान अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक बोजा पडला. त्या दरम्यान शवदाहिनी सुरू राहिल्यास कमी खर्चात अंत्यविधी करता आला असता. पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. हा प्रकल्प अपयशी ठरल्याने नागरिकांनी कररुपी भरलेल्या निधीचा दुरुपयोग झाला आहे. शवदाहिनी दुरुस्त करावी, किंवा गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांकडे ऑक्टोबर 2021 मध्ये देण्यात आले होते. शहरात पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करण्यात येत असल्याने गॅसवर चालणारी शवदाहिनी नागरिकांसाठी उपयोगी पडू शकते. कमी दरात अंत्यविधी करता येऊ शकतो. पण ही सुविधा उपलब्ध करून देण्यास आयुक्त अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मनपाचा कारभार व्यवस्थित नसल्याची टीका नागरिक करीत आहेत.
मनपाच्या सी ऍण्ड आर नियमावलीनुसार महापालिका आयुक्त पदावर आयएएस अधिकाऱयाची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना राजकुमार मोरे, विनय चव्हाण, सूरज पाटील, लखन चव्हाण, अभिषेक कुरणे, मनिष चव्हाण आदींसह नागरिक उपस्थित होते.