पालकमंत्री सतेज पाटील यांचे वक्तव्य : पोटनिवडणुकीत महाविकासआघाडी विजय होणार
कोल्हापूर/प्रतिनिधी
उत्तर च्या पोटनिवडणुकीत आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने भाजपमध्येच खदखद सुरु असल्याचे वक्तव्य पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. तसेच भाजप मध्ये असणाऱ्या अंतर्गत नाराजीमुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वासही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
राजाराम कॉलेज येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात राजश्री छत्रपती शाहू महाराज जन्मशताब्दी वर्षानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आली होते. तत्पूर्वी उत्तर च्या निवडणुकीसंदर्भात प्रसार माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पालकमंत्री पाटील बोलत होते यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. चंद्रकांत पाटील यांनीही जयश्री जाधव या भाजपच्याच असल्याचा दावा केला होता. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली.
भाजपला रोखण्यासाठी एकत्र लढणे गरजेचे
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चार राज्यात भाजपला यश मिळाले त्यामुळे उत्तर मध्येही भाजपला यश मिळेल असा विश्वास भाजप नेत्यांमध्ये आहे, असे विचारले असता पालक मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर शहराचा इतिहास वेगळा आहे येथे देशात काय घडले याला महत्त्व नसते तर कोल्हापूरकरांना जे हवे आहे ते ते करतात. तरीही भाजपला रोखण्यासाठी महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढणे गरजेचे आहे असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.
क्षीरसागर आमच्यासोबतच
उमेदवारी नाकारल्याने राजेश क्षीरसागर नाराज झाले आहेत का या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, उमेदवारी संदर्भात राजेश शिरसागर, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे यांच्यासोबत बैठक झाली आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच महाविकास आघाडीची वाटचाल सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच उत्तरची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला बाधा होणार नाही याची दखल शिवसैनिक घेतीलच तसेच क्षीरसागर ही आमच्या सोबतच असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
भाजपचा एकही मुहूर्त खरा ठरला नाही
शिवसेनेचे 25 आमदार संपर्कात असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे त्यामुळे राज्यात सत्तांतर होणार का या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले राज्यात सत्तांतर होण्या संदर्भात भाजपने अनेक मुहूर्त सांगितले. मात्र त्यांचा एकही मुहूर्त खरा ठरलेला नाही. आत्ताच्या अधिवेशनामध्ये शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होते असे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
राजू शेट्टींना विनंती करू
माजी खासदार राजू शेट्टी हे नेहमीच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत आले आहेत. सानुग्रह अनुदान आणि दिवसा वीज पुरवठा या मागणीसाठी त्यांचे आंदोलन सुरू होते. यापैकी पन्नास हजाराचे अनुदान देण्याची मागणी महा विकास आघाडी सरकारने मान्य केली आहे तर दिवसा वीज पुरवठा करण्याबाबत समिती नेमली आहे. त्यामुळे महाविकासआघाडी मधून बाहेर न पडण्याबाबत प्रसंगी त्यांची भेट घेऊन विनंती करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांनी सांगितले.