वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या महिलांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये 2026 सालापासून संघांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय सोमवारी आयसीसीच्या नियंत्रण समितीने घेतला आहे.
आयसीसीतर्फे सोमवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला क्रिकेट स्पर्धांमध्ये विस्तारीकरण करण्याचा निर्णय सोमवारी घोषित करण्यात आला. या निर्णयानुसार 2026 साली होणाऱया महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 10 ऐवजी 12 संघ राहतील. या स्पर्धेचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचेही विस्तारीकरण 2029 पासून करण्यात येईल. या निर्णयामुळे 2029 च्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 8 ऐवजी 10 संघांचा सहभाग राहील. दरम्यान 2024 साली होणाऱया महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोणताही बदल राहणार नाही. पूर्वीप्रमाणे 10 संघ या स्पर्धेत खेळतील. आयसीसीच्या आगामी महिलांच्या दोन विश्वचषक क्रिकेट स्पर्धांमध्ये आठ संघांचा सहभाग राहील, अशी माहिती आयसीसीचे प्रमुख कार्यकारी मनू साहनी यांनी दिली. महिलांच्या क्रिकेट स्पर्धांना आता पूर्वीच्या तुलनेत संपूर्ण जगामध्ये अधिक प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसून आले आहे. 2027 पासून आयसीसीतर्फे महिलांसाठी टी-20 चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धा नव्याने सुरू केली जाणार असून या स्पर्धेत 10 संघांचा समावेश राहील.









