प्रतिनिधी/ मडगाव
जाणीवपूर्वक फसवणूक करणे, फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनवाबनवी करणे, कागदपत्रे बनावट आहेत याची कल्पना असून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून संबंधीत प्राधिकरणाकडे सादर करणे यासारखे आरोप असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या आर्लेम शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक गुल्शन गुसाई याच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी पोलिसांबरोबर खुद्द आयसीआयसीआय बँक न्यायालयाच्या रणांगणावर उतरलेली आहे.
सोमवारी दुपारी संशयित आरोपी गुल्शन गुसाई याच्या अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिकत सत्र न्यायाधीश एडगर फर्नाडिस याच्या न्यायालयात प्राथमीक सुनावणीस आला तेव्हा संशयिताच्यावतीने ऍड. एस. वेळीप न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी लगेच न घेता थोडय़ा लांब अंतराने ठेवावी अशी विनंती केली.
न्यायालयाने ही विनंती मान्य केली आणि संशयित आरोपी गुल्शन गुसाई याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 9 जुलै 2020 रोजी निश्चित केली.
त्याचबरोबर न्यायालयाने पोलिसांना एक नोटीस जारी केली आणि संशयित आरोपी गुल्शन गुसाई याच्यावरील आरोपासंबंधी पोलिसांचे म्हणणे काय आहे ते 9 जुलै रोजी न्यायालयात सादर करावे असे या नोटीसेत म्हटलेले आहे.
आयसीआयसीआय बँकही
उतरली गुल्शनविरोधात
संशयित आरोपी कुल्शन हा या प्रकरणातील बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणुन नोकरीला होता. मात्र, या संशयिताविरुद्ध अनेक आरोप पोलिसांत झाल्याने ज्या बँकेत संशयित काम करीत होता त्याच आयसीआयसीआय बँकेच्यावतीने ऍड. ए. हळर्णकर यांनी न्यायायलात मध्यस्ती (इंटरवेन्शन) अर्ज सादर केला. या प्रकरणातील एक संशयित आरोपी गुल्शन याच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी या न्यायालयाने परवानगी द्यावी असा बँकेच्या या अर्जाचा आशय हाता. त्यावर न्यायालयाने परवानगी दिली.
आता 9 जुलै रोजी संशयित आरोपी गुल्शन गुसाई विरुद्ध आयसीआयसीआय बँक आणि या एकंदर प्रकरणात फसवणूक झालेल्या तक्रारदाराच्यावतीने सरकारपक्ष यांच्यात न्यायालयात युक्तिवाद होणार आहे.
पार्श्वभूमी
बँक ग्राहकाचा विश्वास संपादन करुन ग्राहकालाच 1.20 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप असलेल्या आर्लेम येथील आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकाची तसेच या प्रकरणातील संशयितांची बँक खाती गोठविण्याचे आदेश तपास यंत्रणेने संशयितांच्या संबंधीत बँकांना दिलेले आहेत.
आयसीआयसीआय बँकेच्या आर्लेम शाखेतील तत्कालीन शाखा व्यवस्थापक गुल्शन गुसाई, आर्लेम शाखेतील या बँकेचे कर्मचारी, बंगळूर येथील ए. एस. एन्टरप्रायझेसचे संचालक, बंगळूर येथील मेसर्स लोहरी कस्टम फर्निचर या आस्थापनाचे संचालक या प्रकरणातील संशयित आरोपी असल्याचे तपास यंत्रणेने यापूर्वीच नोंद केलेल्या गुन्हय़ात नोंदणी केलेली आहे.
पै नावाच्या एका ग्राहकाच्या खात्यात असलेल्या एकूण रकमेपैकी संशयितानी सुमारे 1.20 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे फिर्यादीने फिर्याद केलेली आहे. या प्रकरणासंबंधी लवकरच धरपकड सुरु होणार असल्याचेही संकेत मिळताच एक संशयित आरोपी गुल्शन गुसाई याने अटकपूर्व जामीन अजं न्यायालयात सादर केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वरील संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 403 (मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करणे), 406 ( मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार केल्याप्रकरणी शिक्षा होणे), 409 (बँक व्यवसायिकाने केलेला फौजदारीपात्र गुन्हा), 418 (ज्या व्यक्तीचे हित जपण्याची जबाबदारी आहे त्या व्यक्तीला हानी पोहोचेल याची जाणीव असणे), 420 (जाणीवपूर्वक फसवणूक करणे), 468 (फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनवाबनवी करणे), 471 (कागदपत्रे बनावट आहेत याची कल्पना असून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून प्राधिकरणाकडे सादर करणे) या कलमाखाली यापूर्वीच गुन्हा नोंद केलेला आहेत.









