वृत्तसंस्था/ डब्लीन
पुढील आठवडय़ात होणाऱया आयर्लंड आणि अमेरिका यांच्यातील विविध क्रिकेट मालिकासाठी क्रिकेट आयर्लंडने आपला संघ जाहीर केला असून वेगवान गोलंदाज जोश लिटलचा समावेश करण्यात आला आहे. लिटल सध्या लंकेत सुरू असलेल्या प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेत खेळत आहे.
अमेरिकेच्या भूमीवर पहिल्यांदाच ऐतिहासिक क्रिकेट मालिका खेळविली जात आहे. अमेरिका-आयर्लंड यांच्यात या मालिका होणार असून कोरोना समस्येमुळे खेळाडूंची कोरोना चाचणी या मालिकांपूर्वी घेतली जाणार आहे. कोरोना समस्येमुळे आयर्लंड संघाचे प्रयाण लांबणीवर पडले आहे. आयर्लंड संघातील बॅरी मॅक्रेथी आणि जॉर्ज डॉक्रेल हे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा कोरोना चाचणी घेतली जाईल.
आयर्लंड संघातील टेक्टर आणि डिलेनी यांचे वास्तव्य यापूर्वी फ्लोरिडामध्ये असून ते सध्या अमेरिका टी-20 खुल्या क्रिकेट स्पर्धेत खेळत आहेत. हे दोन्ही क्रिकेटपटू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना दहा दिवसांच्या कालावधीकरिता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.









