वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत येथील सबिना पार्क मैदानावर गुरुवारी झालेल्या सामन्यात आयर्लंडने यजमान विंडीजचा पाच गडय़ांनी पराभव करत या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आयर्लंडने हा विजय डकवर्थ-लेविस नियमाच्या आधारे मिळविला. या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने सुमारे दीड तासाचा खेळ वाया गेला होता.
या मालिकेतील पहिला सामना विंडीजने जिंकून आघाडी मिळविली होती. दुसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजने सर्वबाद 229 धावा जमवित आयर्लंडला 230 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर आयर्लंडने 32 षटकात 4 बाद 157 धावा जमविल्या असताना पावसाला प्रारंभ झाला. पावसामुळे सुमारे 90 मिनिटे खेळ थांबावावा लागला. पंचांनी डकवर्थ-लेविस नियमाचा अवलंब करत आयर्लंड संघाला विजयासाठी 36 षटकात 168 धावांचे किंवा 28 चेंडूत 11 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. आयर्लंडने 7 चेंडूत 11 धावा जमवित हा सामना पाच गडय़ांनी जिंकला. आयर्लंडने 5 बाद 168 धावा जमविल्या. आता या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी सबिना पार्क मैदानावर खेळविला जाईल.
या दुसऱया सामन्यात आयर्लंडचा कर्णधार स्टर्लिंगने आक्रमक फलंदाजी करत आपल्या संघाला पहिल्या पाच षटकात 37 धावा जमवून दिल्या. टेक्टरने 75 चेंडूत नाबाद 54 धावा झळकविल्या. या मालिकेतील त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. टेक्टरने मॅकब्राईनसमवेत 44 धावांची भागीदारी केली. मॅकब्राईनने 35 धावा जमविल्या. टेक्टर आणि कॅम्फर यांनी 53 धावांची भर घातली. तत्पुर्वी विंडीजच्या डावात ब्रुक्सने 64 चेंडूत 43 धावा जमविल्या. विंडीजची एक वेळ स्थिती 3 बाद 53 अशी केविलवाणी होती. तर 40 षटकाअखेर त्यांनी 7 बाद 143 धावांपर्यंत मजल मारली होती. ओडेन स्मिथने आक्रमक फटकेबाजी करताना मॅकब्रिनेच्या गोलंदाजीवर 2 षटकार तर कॅम्फरच्या गोलंदाजीवर आणखी दोन षटकार ठोकले. स्मिथने 19 चेंडूत 46 धावा जमविताना शेफर्डसमवेत 58 धावांची भागीदारी केली. शेफर्डने 4 चौकार ठोकल्याने विंडीजला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. आयर्लंडच्या मॅकब्राईनने 36 धावात 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 48 षटकात सर्वबाद 229, आयर्लंड 5 बाद 168 (विजयासाठी 36 षटकात 168 किंवा 28 चेंडूत 11 धावा नवे उद्दिष्ट).









