वृत्तसंस्था/ लंडन
आयर्लंड क्रिकेट संघातील अष्टपैलू केव्हिन ओब्रायनने शुक्रवारी वनडे क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. 37 वर्षीय ओब्रायनने आयर्लंड संघाकडून खेळताना फलंदाजीत 3619 धावा झळकविल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत 114 बळी मिळविले आहेत.
केव्हिन ओब्रायनने वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी तो यापुढे काही वर्षे टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे. आपल्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत 2011 साली झालेल्या आयसीसीच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ओब्रायनने त्या स्पर्धेतील सर्वात जलद शतक झळकविले होते. 10 वर्षापूर्वी झालेल्या या स्पर्धेतील बेंगळूर येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ओब्रायनने 50 चेंडूत शतक झळकविले होते. या कामगिरीमुळे आयर्लंडने इंग्लंडचा 3 गडय़ांनी पराभव केला होता. या सामन्यात ओब्रायनने 63 चेंडूत 6 षटकारांच्या मदतीने 113 धावा झोडपल्या होत्या. ओब्रायनने 153 वनडे सामन्यात आयर्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे.









